न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०१९) :- वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी भर्ती झालेल्या रुग्णाला साधा आजार असताना डॉक्टरांनी त्या रुग्णाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान केले. तसेच त्या रुग्णाचे त्वरित डायलेसिस करण्याची गरज असल्याचे सांगितले. रुग्णाला जुजबी आजार असल्याचे दिसत असतानाही डॉक्टरांनी केलेल्या निदानाचा संशय आल्याने रुग्णाच्या नातेवाईकाने खासगी रुग्णालयात चेक-अप केले असता रुग्णाच्या किडन्या व्यवस्थित असल्याचे दिसले. वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडला असल्याचे नंतर निष्पन्न झाले. या कृतीमुळे त्या रुग्णाचे नातेवाईक व त्या रुग्णास मानसिक त्रास झाला आहे. त्यामुळे त्या डॉक्टरास तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी शहर मनसेने महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी या निवेदनात म्हटले आहे की, सांधेदुखी आणि तापामुळे वेताळनगर मधील आनंद अनिवाल हा आपल्या रुग्णालयात दाखल झाला असता, त्याच्या विविध तपासण्या केल्या गेल्या. त्यामध्ये ब्रिटेनिन चे प्रमाण सुमारे २४ असल्याचे दाखविण्यात आले. हे प्रमाण ज्यास्त असल्याने त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान डॉक्टरने केले, तसेच त्वरित डायलेसिस करण्याची गरज असल्याचे त्याच्या नातेवाईकांना संगितले, तोपर्यंत त्या रुग्णाचे पुन्हा रक्त घेऊन ते तपासणीकरिता पाठविले. त्याचाही अहवाल आला. परंतु, तो अहवाल न पाहताच डॉक्टरानी डायलेसिस देखील केले संबंधीत नातेवाइकांनी खाजगी रुग्णालयातून अहवाल आणला तसेच आपल्या रुग्णालयातील दूसरा अहवाल पहिला असता त्यामध्ये चक्क ब्रिटेनिनचे प्रमाण सामान्य दाखविले गेले. म्हणजेच त्या रुग्णाच्या दोन्ही किडन्या उत्तम असतानाही काही कारण नसताना त्याचे डायलेसीस केले गेले. ही बाब अतिशय गंभीर आणि आपल्याकरिता शरमेची आहे.
वास्तविक पाहता डॉक्टरनी नंतर आलेला तपासणी अहवाल आधी पाहायला हवा होता. त्यानंतरच पुढील कार्यवाही करण्याची गरज होती. डॉक्टरांना रुग्ण देव म्हणत असताना. अशी घोडचूक झालीच कशी? दूसरा तपासणी अहवाल डॉक्टरांनी का नाही पाहिला? ज्या डॉक्टरांनाकडून ही गंभीर चूक झालेली आहे. त्यानी केवळ माफी मागितली. परंतु डॉक्टरांच्या अश्या प्रकारच्या कामकाजामूळे रुग्णालयातील इतर रुग्ण डॉक्टरवर विश्वास ठेवतील का? तसेच ज्या मशीन मधून आधी ब्रिटेनिनचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले ती मशीन चांगली आहे का? आणि जर ती मशीन चांगली असेल तर अहवाल चुकीचा कसा काय आला?
या सर्व गोष्टीमुळे त्या रुग्णावर तसेच त्याच्या नातवाईकांवर काय प्रसंग ओढावला असेल त्याची कल्पना आपण केली का? आपल्या रुग्णालयातील अशा बेजबादारपणे काम करणाऱ्या तसेच रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी डॉक्टरांना खुलासा देण्याची कोणत्याही प्रकारची संधी न देता त्वरित निलंबनाची कडकं कारवाई करावी. झालेला प्रकार हा अतिशय दुर्दैवी असून, यावर लगेच कारवाई करून पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची दक्षता आपण घ्यावी. तसेच त्या डॉक्टरवर आपण त्वरित कडक कारवाई करावी, असे या निवेदनात चिखले यांनी म्हटले आहे.
याप्रसंगी दत्ता साने (विरोधी पक्षनेता), सचिन चिखले (मनसे शहर अध्यक्ष), अश्विनी बांगर (महिला सेना अध्यक्ष), राजु भालेराव (जनहित कक्ष अध्यक्ष) रुपेश पटेकर (सचिव मनसे), सिमाताई बेलापुरकर (सचिव मनसे), विशाल मानकरी (विभाग अध्यक्ष), दत्ता देवतरासे (विभाग अध्यक्ष), संजय दादा यादव (विभाग अध्यक्ष), स्नेहल बांगर ( उपशहर अध्यक्ष ) अनिता पांजाळ ( उपशहर अध्यक्ष) अनिता नाईक (महिला सेना), सुशांत साळवी-शहर संघटक, सचिन मिरपगार-उपाध्यक्ष भोसरी विधानसभा, मिलिंद के सोनवणे-उपविभाग अध्यक्ष पिंपरी विधानसभा, विकास क़दम-विद्यार्थी सेना, भाग्यश्री चिंचोले, स्वप्नील मंहागरे, आकाश पांचाळ, गणेश वाघमारे, प्रदीप घोडके आदी उपस्थित होते.












