न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात कचऱ्याची बजबजपुरी झालेली आहे. शहरातील नागरिक नियमित कचरा उचलला जात नसल्यामुळे मेटाकुटीला आले आहेत. राष्ट्रवादी याबाबत प्रश्न उपस्थित करीत आहे. मात्र सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकही विरोधकांच्या सुरात सूर मिसळताना दिसतात. हे शहरातील सत्ताधारी पक्षाचे सर्वात मोठे अपयश आहे, भाजपकडे कोणतेही नियोजन नाही. ‘व्हिजन’ चा अभाव आहे, असा आरोप अजित पवार यांनी भाजपला लक्ष करीत यावेळी केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात खासगी हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी आज शनिवार (दि. १३) रोजी ते आले होते. त्यावेळी अजित पवार बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, शहरातील न्याय व्यवस्था बिघडली आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या जनसंपर्क कार्यालयावर भ्याड हल्ला झाला. सत्ताधारी पोलीसबळाचा वापर करून शहरात गुन्हेगारी वाढवत आहेत. त्यामुळे शहराचा क्राईम रेट वाढत आहे. यावर नियंत्रण आणावे याकरीता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याशी बोलणे झाले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार भाजप वाटेवर आहेत, असा पक्षावर आरोप होत आहे. तसे म्हणण्यापेक्षा त्या आमदारांची नावे सांगा, उद्या कोणीही काहीही म्हणेल. जे वाटेवर असतील ते जातील, असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी शहर राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.












