- कृती समिती अध्यक्ष विजय पाटील यांचा आरोप
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०१९) :- सध्या शहरात ठेकेदारांच्या मनमानी कामाची मोठी चर्चा सुरू आहे. महापालिकेतही ठेकेदारांच्या कामावर लोकप्रतिनिधींनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जलपर्णीचा विषय असो, की शहरातील कचऱ्याचा विषय की देवदूतचा विषय ठेकेदारांनी टक्केवारीच्या बाबतीत सर्व सीमा ओलांडल्या आहेत. याबाबत प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, शहरात अनेक निकृष्ठ दर्जाची कामे सुरु आहेत. त्यातच अनेक वर्षांपासून महापालिकेत ठाण मांडून बसलेले ठेकेदार ‘मात्र’ मालामाल झालेले आहेत. भ्रष्ट कारभार त्यातच भ्रष्ट कारभाऱ्यांची त्यांना मिळणारी ‘साथ’ त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत काही जणांचा मोठा आर्थिक ‘विकास’ झाला आहे. “सबका साथ सबका विकास” म्हणजे नेमके काय रे भाऊ? अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यातच आता ड्रेनेज दुरुस्तिच्या कामामध्ये मोठी अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिसून आले आहे.
समितीचे सदस्य विजय मुनोत, बाबासाहेब घाळी, संतोष चव्हाण, अमोल कानु, अमित डांगे आणि अध्यक्ष विजय पाटील यांच्या पाहणीमध्ये ड्रेनेज दुरुस्ती तसेच डागडुजी कामामध्ये कमी प्रमाणात सिमेंट, वाळू तसेच विटांचा वापर दिसून आला आहे. ड्रेनेज दुरुस्ती चे काम दोन दिवस सुद्धा टिकले नाही. एवढ्या निकृष्ट पद्धतीचे काम ठेकेदाराने केलेले दिसून आले. ४ महिन्यांपूर्वी दुरुस्त केलेले गोलाकार ड्रेनेज पुन्हा दुरुस्त केल्याचे पाहणीत आढळले. अश्या निकृष्ट पद्धतीने केलेल्या कामामुळे अनेक ठिकाणी ड्रेनेजची सिमेंट झाकणे सैल झाली आहेत. त्यामुळे मोठ्या पावसात अपघात होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी सिमेंट व वाळूचे प्रमाण कमी वापरल्यामुळे ते मिश्रण पूर्णपणे निघून गेले आहे.

बिजलीनगर, वाल्हेकरवाडी मधील शिवनगरी रोडवरील ड्रेनेजचे काम तर भर पावसात करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सदरचे काम २४ ताससुद्धा टिकले नाही. वस्तुतः ड्रेनेज दुरुस्ती व डागडुजीचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी करणे आवश्यक आहे. परंतु ठेकेदार वेळेवर काम करीत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या कररूपी पैश्याची सर्रास उधळपट्टी होते.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” ड्रेनेज दुरुस्ती किंवा ड्रेनेजची झाकणे रस्ता समतल करून घेण्याकरिता दरवर्षी लाखो रुपयांची निविदा काढली जाते. परंतु, असे काम व्यवस्थित पूर्ण झाले की नाही याबाबत कोणतीही शास्त्रशुद्ध पद्धत महापालिका प्रशासन आमलात आणत नाही. त्यामुळे ह्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिसून येतो. बऱ्याच वेळा दुरुस्ती न करताही बिले अदा केली जातात. ह्या बाबत माननीय आयुक्तांनी विशेष दक्षता पथकाची नियुक्ती करावी व दोषी अधिकारी आणि अनियमित काम करणारे ठेकेदार यांना कडक शासन करावे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे,” असे या निवेदनात पाटील यांनी म्हटले आहे.












