न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी :- आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब रिजन ५ चे रिजन चेअरमन आनंद मुथा यांच्या पुढाकाराने लायन्स ऑफ चिंचवड रॉयलच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत आयोजित केलेल्या शिक्षक प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिक्षकांसाठी विद्यार्थी नेत्र तपासणी व तातडीक प्रथमोपचार या विषयावर आयोजित केलेल्या या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा, उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे, रिजन चेअरमन आनंद मुथा, झोन चेअरमन मनोज बन्सल, चिंचवड रॉयल क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्वप्नाली धोका आदी उपस्थित होते.
प्रांतपाल शहा यांनी मनपा शाळेतील मुलांसाठी देखील नेत्र तपासणी मोहिम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नेत्रतज्ञ डॉ. सुशील मुथियान यांनी नेत्रदान जनजागृती या विषयावर डॉ ललितकुमार धोका यांनी तातडीक प्रथमोपचार या विषयावर नेत्रतज्ज्ञ निलेश काकडे, भुलतज्ञ डॉ सोनाली सावळे, डॉ. गोनचीकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. ललित धोका यांनी लिहिलेल्या बालकांसाठी प्रथमोपचार या पुस्तकाचे प्रकाशन केले. डॉ. मुथियान म्हणाले कि, समाजात आजही नेत्रदानांबद्दल गैरसमज आहे. सध्या देशभरात १२ /१३ लाख बुबळांची गरज आहे. त्याच्या तुलनेत ३० ते ४० हजार बुबळे जमा होतात. यापैकी निम्मे बुबळं वापरण्याजोगे असतात. शासन आणि सामाजिक संस्थांकडून जनजागृती होऊन देखील नागरिकांमध्ये नेत्रदानाबदल उदासीनता आहे.
केवळ नेत्रदानाचा अर्ज भरून आपली जबाबदारी पूर्ण होत नाही. नेत्रदानाचा अर्ज भरणे म्हणजेच आपल्या सोबत अजून एक व्यक्तीला नेत्रदानास प्रवृत्त करणे आहे. आयुष्यात येता-जाता श्रमदान, जगता- जगता रक्तदान, जाता -जाता नेत्रदान, आणि गेल्यावर देहदान केले पाहिजेत.
यावेळी डॉ.धोका म्हणाले कि, शाळेत मुलांना शिक्षकांनी तातडीचे प्रथमोपचार दिल्यास होणारी मोठी दुर्घटना टाळू शकतो. यासाठी वर्गातील कोणत्या विद्यार्थंना काय त्रास होतो याबाबतीतची माहिती शिक्षकांनी ठेवली पाहिजेत.किरकोळ जखम झाल्यावर स्वच्छ धुवून काढा तर मोठी जखम असल्यास होणारा रक्तस्त्राव थांबवावा.
डॉ. काकडे यांनी शाळेतच मुलांची नेत्रतपासणी कशी करायची यायबाबतीचे शिक्षण दिले. एखादा मुलगा जवळून टीव्ही पाहत असेल तर समजून जा त्याला चष्मा लागला आहे. सतत चष्मा लावल्याने डोळ्याचा नंबर जात नाही. असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश माटे यांनी केले तर आभार मनोज बन्सल यांनी मानले.











