न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी :- न्यायालयाचा निर्णय झुगारून अनेक ठिकाणी पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा मांजाची सर्रास विक्री होत असून या जीवघेण्या मांजापासून अपघातास निमंत्रण मिळत असून मांजास प्रतिबंध करणे गरजेचे आहे.
रविवारी (दि. ७ ) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पुणे भोसरी मार्गावर कासारवाडी येथील जे आर डी टाटा उड्डाणपुलावर दुचाकीवरून जात असलेल्या तरुणीच्या गळ्याभोवती मांजा गुंडाळला गेल्याने तिचा मृत्यू झाला.
डॉ. कृपाली निकम वय २६, रा. पिंपळे सौदागर, मूळ रा. चाळीसगाव, जळगाव, असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी त्यांची मैत्रीण त्यांच्या घरी आली होती. घरचा संपूर्ण पाहुणचार झाल्यानंतर मैत्रिणीला सोडण्यासाठी डॉ. कृपाली अॅक्टिवा दुचाकीवरून पुणे रेल्वे स्थानकावर गेल्या व येताना भोसरीच्या दिशेने जाताना कासारवाडी येथील जे आर डी टाटा उड्डाणपुलावर आल्या असता त्यांच्या गळ्याला मांजा अडकला. गाडीचा वेग थोडा जास्त होता व क्षणात हा प्रसंग ओढवला.
ताजे वृत्त हाती आले तेव्हा महापौर श्रवण हार्डीकर यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून मांजा विक्रीस कायमचा आळा बसावा याकरिता महापालिका स्तरावर आरोग्य निरीक्षकाकडे याची जबाबदारी दिली जाणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.













