न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०१९) :- शहरातील शास्तिकर १०० टक्के माफ करू असे आश्वासन देत सत्ताधारी भाजप पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तेवर आले. मात्र, अद्यापपर्यंत सत्ताधारी भाजपने शास्तीकर १०० टक्के माफ केला नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपचे आश्वासन हवेतच विरल्याचे जमा आहे. याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वाखाली बाधित नागरीकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, पिपरी चिंचवड महानगरपालिकेने अनाधिकृत बांधकाम केलेल्या नागरीकांकडून शास्तीकर (मिळकत कराच्या दुप्पट अधिक मिळकत) ३१ मार्च २०१८ पासून वसुल करण्यात येत आहे. हा शास्तिकर म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असा प्रकार असून, शास्तीकर भरुन नागरीक मेटाकुटीस आलेले आहेत. शास्तिकर शंभर टक्के माफ करू म्हणून सत्ताधारी पक्षाने राज्यात, पालिकेत सत्ता मिळवली. परंतु, शास्तिकर शंभर टक्के माफ करू शकले नाहीत.
शहरातील शास्तिकर बाधित नागरिकांची शास्तीकर १०० टक्के माफ करण्याच्या दृष्टीने पुढील दिशा ठरविण्यासाठी गुरुवार (दि. १८) रोजी सकाळी ११.३० वाजता आकुर्डी येथील खंडोबा मंदिराच्या आवारात बैठक बोलाविण्यात आली आहे. शहरातील सर्व शास्तीकर बाधित नागरिकांनी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन मा. विरोधी पक्षनेते दत्ता साने, संदिप बेलसरे, अध्यक्ष, पिं. चि. लघुउद्योग संघटना, जयंत कड, उद्योजक, पि. चि. लघुउद्योग संघटना, राजेंद्र सुखदेव चेडे, अध्यक्ष, मराठा महासंघ, सचिन पाटील, उद्योजक, तळवडे, किशोर राजशिर्के, अब्बास तांबोळी, दिलिप तापकीर, बाळासाहेब मोळक, अनुपमा शिंपी आदींनी केले आहे.












