न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०१९) :- ज्ञानप्राप्तीला वयाची अट व बंधन नसते म्हणतात. भारतातील मुक्त शिक्षण पद्धतीमध्ये कोणीही कोणत्याही वयात शिक्षण घेऊ शकतो मात्र, राजकारणा सारख्या धकाधकीच्या व प्रचंड व्यस्तता असलेल्या क्षेत्रात राहून देखील आमदार चाबुकस्वार यांनी नुकतीच पाली भाषेतील एमफिल ही पदवी प्राप्त केली. या पदवीमुळे आता आमदारांच्या पदव्यांची संख्या पाचपर्यंत पोहोचली असून, विधिमंडळातील ते सर्वात उच्चशिक्षित आमदार ठरले आहेत.
गेली ३३ वर्षे राजकारणात सक्रीय असलेले ॲड. गौतम चाबुकस्वार हे २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेतर्फे पिंपरी मतदारसंघातून निवडून आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते गेली १२ वर्षापासून आजही अध्यापनाचे काम करतात. आमदार झाल्यानंतर विधिमंडळात शपथ घेताना त्यांनी पाली भाषेला प्राधान्य देत व भारतातील या मूळ भाषेत त्यांनी शपथ घेऊन संपूर्ण राज्याचे लक्ष आपल्याकडे वेधले होते.
बी.कॉम, डिप्लोमा इन पाली, एम.ए, एल.एल.बी. व एमफील (पाली) अशी त्यांची शैक्षणिक पात्रता झाली असून आता पीएचडी (डॉक्टरेट) साठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या चाबुकस्वार यांनी आपल्या या शैक्षणिक आलेखाबद्दल म्हटले की, माझी प्रेरणा व उर्जा डॉ. बाबासाहेब आंबेडकर असून त्यांच्या विचारकार्यानुसार मी राजकारणात राहूनही शिक्षणाची आस याही वयात बाळगून आहे.


















