न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०१९) :- २०१८ पासून ते १ जुलै २०१९ वर्षभर कचरा संकलन व वाहतुकीच्या निविदा प्रक्रिया ते प्रत्यक्ष काम सुरू होई पर्यंतच्या कामाबाबत चर्चा संपूर्ण शहरात आहे. १ जुलै पासून खरोखरच स्वच्छ सुंदर पिंपरी चिंचवड होणार असे दिवास्वप्न दाखविण्यात आले. परंतु, आज रोजी कचरा संकलन वाहतुकीच्या कामकाजाचा बोजवारा वाजल्याचे निदर्शनास येत आहे.
शिवसेना पक्षाच्यावतीने सामाजिक बांधीलकीने “आजची कचरा समस्या व भविष्यकालीन व्यवस्थापन” या विषयावर शहरातील सामाजिक क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, सोसायटी प्रतिनिधी, कचरा वेचक प्रतिनिधी, कचरा व्यवस्थापन प्रतिनिधी व पत्रकार प्रतिंनिधी या मान्यवरांसह सुज्ञ, तज्ञ नागरिकांचे एक चर्चासत्र गुरुवार दि. १८/०७/२०१९, वेळ सकाळी १० वाजता, स्थळ : अटो क्लस्टर हॉल चिंचवड स्टेशन येथे आयोजित केले आहे. या चर्चासत्राचे मा. महापौर, मा. आयुक्त, व मा. आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांना देखील चर्चासत्रात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
निश्चितच या चर्चासत्राद्वारे विचार मंथन होऊन भविष्यकालीन कचरा व्यवस्थापन व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शहरातील आपण सर्व करदाते नागरीक यांना अपेक्षित असणारे स्वच्छ व सुंदर पिंपरी-चिंचवड निर्माण होण्यास मदत होईल. तरी कृपया शहरातील करदाते, सुज्ञ नागरिक बंधु भगिनींनी आपल्या सूचना व तक्रारीसह या चर्चासत्रात उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात येत आहे.















