न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०१९) :- शहर विकासासाठी पदाधिकारी नगरसदस्या, नगरसदस्य यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करुन त्यांच्या प्रभागातील कामे पूर्ण करावीत, अशा सूचना महापौर राहूल जाधव यांनी अधिका-यांना दिल्या.
प्रभागस्तरावरील अडचणी व विकास कामांबाबतच्या आढावा बैठकांचे आयोजन सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये त्यांनी केले असून आज ‘ड’ प्रभागाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला “ड” प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, जैवविविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, नगरसदस्या अश्विनी वाघमारे, रेखा दर्शले, ममता गायकवाड,आरती चोंधे, चंदा लोखंडे, नगरसदस्य तुषार कामठे, संदिप कस्पटे, शत्रुघ्न काटे, विठ्ठल काटे, सागर आंगोळकर, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, सिताराम बहुरे, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुके, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, देवान्ना गट्टुवार, माहिती व जनसंपर्क विभागातील मुख्य लिपीक रमेश भोसले आदि मान्यवरउपस्थित होते.
यावेळी महापौर राहुल जाधव यांनी कचरा वेळच्यावेळी उचलणे, कचरावाहतूक गाड्यांची संख्या वाढवून फे-या वाढविणे,पाण्याच्या टाक्या धुवून टाकणे, ठिकठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन करणारे फलक लावणे, कचरा उचलण्यासाठी क्षमतापूरक कचरा गाड्या ठेवणे, तसेच अनुभवी ठेकेदार व अनुभवी कर्मचा-यांची नेमणुक करणे, ओला व सुका कचरा वेगळे करण्याचे सुयोग्य नियोजन करणे, तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी विशेष काळजी घेवून सर्व शाळा स्वच्छ ठेवणेबाबत विशेष लक्ष देण्यासही महापौर यांनी सांगितले. पाणीपुरवठा सुरळीत होणे कामी प्रलंबीत पाणी पुरवठा बाबतची कामे पुर्ण करणे बाबतच्या सुचना महापौर राहुल जाधव यांनी दिल्या.















