न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०१९) :- लोकसभेच्या पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने विधानसभा निवडणुकीत जनतेचा जनाधार मिळविणे, जनतेला विश्वास देण्याचे आमचे ठरले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणूक मोठ्या ताकदीने लढणार आहोत. जागावाटपा संदर्भात काँग्रेससोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. सर्व मित्र पक्षांना सोबत घेणार आहोत. महाराष्ट्र राज्याला दूरदृष्टी असलेले चांगले सरकार आम्ही देणार आहोत असेही अजित पवार यांनी सांगितले.
सांगवीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, मा. आ. विलास लांडे, मा. उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे, अतुल शितोळे आदी उपस्थित होते. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ यांच्या पराभवाचा पवार कुटुंबियांना कोणताही धक्का बसला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पडलेल्या उमेदवाराच्या पराभवाने जेवढे दुःख झाले तेवढेच पार्थ पवार यांच्या पराभवाचे दुःख झाल्याचे अजित पवार यांनी सांगीतले. पार्थ या पराभवाने खचला नसल्याचेही ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवड शहर बेस्ट सिटी होते. त्यानंतर स्मार्ट सिटी झाले. आता मात्र सत्ताधारी भाजप यांनी स्मार्ट सिटीची वेस्ट सिटी केल्याची टीका त्यांनी केली. तसेच कचऱ्याची निविदा मंजूर रद्द आणि पुन्हा मंजुरीचा घोळ घातला. जनतेचे हित पाहिले नसल्याने शहर कचऱ्यात गेले. सलग दोन वर्षे स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड शहराची घसरगुंडी होत आहे, भाजपाचेच नगरसेवक महापालिकेत कचरा टाकत आहेत. सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर देत आहेत. शहरातील कचरा पंधरा-पंधरा दिवस उचलला जात नाही. नवीन गाड्या घेऊन देखील त्यांच्या समस्या मार्गी लागलेल्या नाहीत.
मुंबईतल्या डोंगरी भागात असलेली केसरबाई इमारत खेकड्यांनी पाडली असे सरकारने जाहीर करून टाकावे असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटलं असं वक्तव्य जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं. त्याचाच संदर्भ घेत अजित पवारांनी आता डोंगरी इमारत दुर्घटनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे.















