न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०१९) :- चिखली-मोशी हौंसिग सोसायटी फेडरशेनच्या वतीने सिटी प्राईड स्कूल, रिव्हर रेसीडन्सी रोडसमोर, देहू-मोशी रोड, जाधववाडी चिखली या ठिकाणी आ. महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. २१) रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत गृहनिर्माण सोसायट्यांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून चिखली-मोशी या परिसरात उभ्या राहिलेल्या उच्चभ्रू गृहनिर्माण सोसाट्यांकडे झालेले दुर्लक्ष, या दुर्लक्षावर उपाययोजना करण्यासाठी चिखली-मोशी हौसिंग सोसायटीतर्फे आयोजित परिसंवादामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर मार्गदर्शन करणार आहेत. या परिसंवादामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक सोसायटीतील फक्त एका पदाधिकाऱ्यासच प्रवेश मिळणार असून, आपण आपल्या सोसायटीचे प्रश्न मुद्द्याअंतर्गत मांडावेत.
वाहतूक समस्या, अतिक्रमण, विकसकांकडून होणारा त्रास व फसवणूक, प्रस्तावित अद्यावत रस्त्यांच्या विकासाबाबत, वाढते प्रदूषण व अनधिकृत भंगार व्यावसाय, प्रस्तावित विकसित आराखडा, भविष्यातील पाण्याचे नियोजन, ओला व सुका कच-याचे नियोजन, व्यवस्थापन, नियोजित सांडपाणी प्रकल्प, महिला सुरक्षा आणि वाढती गुन्हेगारी आदी विषयांवर या परिसंवादात सखोल चर्चा होणार आहे, अशी माहिती निमंत्रक विकास साने, संजीवन सांगळे फेडरेशनचे सचिव, अनिकेत गायकवाड आदींनी दिली आहे.


















