न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०१९) :- पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात पंचनामा न झाल्याने पाच मृतदेह सात तास तसेच ठेवले. मृत्यूनंतरदेखील मृतांनाही प्रशासनाचा हलगर्जीपणा सहन करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार या निमित्ताने समोर आला आहे. हा प्रकारी मंगळवारी घडला.
शाहूनगर येथील सुभाष पांडुरंग सोनवणे (वय ६०) यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वायसीएममध्ये आणला. त्याचप्रमाणे रामनगर येथील इंद्रभान आनंद भोर (वय ७२) आणि सोनाबाई बापू विटकर (वय ७५) यांचाही दीर्घ आजारांने मृत्यू झाला. याबरोबरच अजून तीन मृतदेह विच्छेदन करण्यासाठी शवागृहात आणले. मात्र सकाळपासून एकही शवविच्छेदन झाले नसल्याने नातेवाइकांनी शवागृहाबाहेर मोठी गर्दी केली होती.












