न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०१९) :- दिघी रोड भोसरी येथे प्रियदर्शनी हायस्कूल आहे. या शाळेत अमित पाटील मुख्याध्यापक असून आरोपी राजश्री क्लार्क म्हणून काम करतात. २०१५ ते १४ जून २०१९ या कालावधीत पालकांकडून विद्यार्थ्यांच्या फीचे पैसे राजश्री यांनी स्वीकारले. त्याची शाळेच्या संगणकात नोंद केली.
पण शाळेच्या नोंद खतावणी रजिस्टरमध्ये नोंद न करता सुमारे १ हजार ३५५ पावत्या त्यांनी संगणकातून काढून टाकल्या. त्यामुळे काढून टाकलेल्या पावत्यांचे कोणतेही रेकॉर्ड शाळेकडे राहिले नाही. याचा गैरफायदा घेत त्यांनी एकूण ८ लाख ९१ हजार ७९७ रुपयांचा अपहार करून शाळेची फसवणूक केली.
मुख्याध्यापक अमित पाटील यांना मागील काही दिवसांपूर्वी याबाबत संशय आला. त्यांनी खतावणी रजिस्टर, संगणकातील रेकॉर्ड यांचा तपशील तपासला असता हा प्रकार समोर आला. याबाबत मुख्याध्यापक अमित बापूसाहेब पाटील (वय ४०, रा. पिंपरीगाव) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजश्री देशमुख (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) या महिला क्लार्क विरोधात गुन्हा नोंदवला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.












