न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०१९) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करून राजकारणामध्ये मोठं होण्याचा बालिशपणा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील करीत आहेत. पवारसाहेबांवर टीका केल्याने माणूस मोठा होत नाही, असा राजकीय इतिहास महाराष्ट्रात असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभा इच्छुक उमेदवार शेखर ओव्हाळ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, युवा नेते पार्थ पवार, माजी आमदार आण्णा बनसोडे, विलास लांडे, आझमभाई पानसरे, माजी महापौर व नगरसेवक योगेश बहल, मंगला बनसोडे, शहर राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते आदी कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी जेष्ठ नेते आझमभाई पानसरे यांची ग्रंथतुला करण्यात आली.
लोकसभेनंतर सर्व राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना हे फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. भाजप आणि सेनेला सत्तेची मस्ती चढली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर येताच चंद्रकांत पाटील ठिकठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचे वक्तव्य करीत आहेत . त्यामुळे पाटील यांच्या संपर्कात आमच्या पक्षाच्या कोणत्या व्यक्ती आहेत ते त्यांनाच माहीत आहे. मात्र आमच्याही संपर्कात भाजपचे काहीजण आहेत, असंही मुंडे यांनी म्हटलं आहे.












