न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड पालिकेने तब्बल सुमारे र. रु. २५ कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करुन, भोसरी गावठाण येथील गावजत्रा मैदानाजवळ रुग्णालयाची ४ मजली इमारत उभारली आहे. या रुग्णालयामुळे भोसरीसह समाविष्ट भागांतील मोशी, चिखली, च-होली, वडमुखवाडी, डुडुळगाच आदी भागांसह आळंदी, जुन्नर, खेड या परिसरांतील सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. परंतु, महापालिकेने मध्येच खाजगीकरणाचा घाट घालत रुग्णालय खाजगी तत्वावर देण्यासाठी हालचाली सुरु केल्या.
शेवटी विरोध झाल्याने या विषयास तात्पुरती स्थगिती मिळाली. आत हा विषय गुंडाळण्याच्या तयारीत महापालिका प्रशासन आहे. तसेच या रुग्णालयासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याचीही नियुक्ती महापालिकेने केली आहे. यावर सभेत त्वरित निर्णय होऊन भोसरी रुग्णालय महानगरपालिकेच्या वतीने लवकरात लवकर चालु करावे, अशी मागणी आधार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भुंबे यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, भोसरी हॉस्पिटलसाठी आपण डॉ. जाधव यांची नियुक्ती केली. त्याबद्दल आभार. खऱ्या अर्थानं हे हॉस्पिटल अनेक गरिबांसाठी वरदान ठरणार आहे. हे हॉस्पिटल पूर्ण झाले आहे आपण लवकरात लवकर आंतररुग्ण उपचार व बाह्य उपचार सुरु करावेत. सध्याचे वातावरणात सर्दी, ताप व अनेक आजार वाढले आहेत. यावर उपाय म्हणून आपण हे हॉस्पिटल व ओपीडी चालू करावी. खाजगीकरण रद्द करण्यात आले आहे काय याची माहिती द्यावी. या विषयाचे पत्र मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांच्याकडे देखील पाठवले आहे, असे भुंबे यांनी या निवेदनात म्हटले आहे.












