न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०१९) :- पुणे परिमंडळ क्षेत्रात आरोपपत्र दाखल केलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी करावी. तसेच, पुणे येथे वीज ग्राहकांच्या विविध तक्रारी ऐकण्यासाठी जनता दरबार भरविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य व चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
त्यांनी ऊर्जामंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ”मी गेली तीन वर्षापासून इन्फ्रा २ योजनेत कोट्यावधी रुपयांचा झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आपणाकडे तक्रारीच्या अनुषंगाने सतत पत्र व्यवहार करत आलो आहे. आपण इन्फ्रा २ योजनेचा योग्य वापर होण्यासाठी दक्षता व सुरक्षा विभाग पुणे यांना भ्रष्टाचाराबाबत चौकशीचे आदेश दिले होते.
पुणे परिमंडळ क्षेत्रा अंतर्गत विविध विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्या प्रकरणी दक्षता व सुरक्षा विभाग मुंबई यांनी ठपका ठेवून कारवाईसाठी तत्कालीन पुणे प्रादेशिक संचालक यांच्याकडे कारवाईसाठी अहवाल दिला होता. मात्र, त्यांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करत काही अधिकाऱ्यांना निर्दोष मुक्त केले. मात्र अजूनही निर्दोषत्व सिद्ध न झालेल्या इतर अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी दीड ते दोन वर्षाचा कालावधी लागतो याचे आश्चर्य वाटते. आपल्यावर काहीच कारवाई होत नसल्याचे लक्षात आल्याने सदर अधिकारी मोकळे रान मिळाल्यासारखे मोकाट फिरत आहेत. सदर अधिकारी यांच्यावर आपल्या खात्याचे अधिकारी कारवाई करीत नसल्याने त्यांची लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी करून कारवाईसाठीचे आपण आदेश द्यावेत. हि विनंती.
आपला पुणे येथे दोन वर्षापूर्वी दि.२०/०४/२०१७ रोजी जनता दरबार झाला आहे. त्यानंतर मात्र आपला जनता दरबार न झाल्यामुळे अधिकारी बिनधास्त आहेत. वीज ग्राहकांच्या मीटर्सबाबत तसेच विविध प्रकारच्या अनेक तक्रारी आहेत. याबाबत पुन्हा एकदा पुणे येथे आपण जनता दरबार घेऊन वीज ग्राहकांच्या व्यथा जाणून घ्याव्यात. जेणेकरून वीज ग्राहकांचे हित जोपासले जाईल, असे या पत्रात सौंदणकर यांनी म्हटले आहे.
या निवेदनाची प्रत त्यांनी मा. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सो., मुंबई यांनाही पाठविली आहे.












