- कृती समितीच्या शास्तीकर बाधितांचा पिंपरी चिंचवड महापालिकेवर मोर्चा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०१९) :- शहरातील शास्तिकर १०० टक्के माफ करू असे आश्वासन देत सत्ताधारी भाजप पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तेवर आले. मात्र, अद्यापपर्यंत सत्ताधारी भाजपने शास्तीकर १०० टक्के माफ केला नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपचे आश्वासन हवेतच विरल्याचे जमा आहे. नागरिकांना ८० ते ८५ लाख रुपयांच्या दंडाच्या नोटिसा दिल्या आहेत. नागरिकांनी एवढा दंड कोठून भरायचा? दोन-दोन गुंठे जागा घेऊन घर बांधलेल्या नागिरकांनी काय करायचे? त्यामुळे महापालिकेने अवैध बांधकामावरील शास्तीकर रद्द करावा, अशी मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी केली.
पिंपरी-चिंचवड नागरी कृती समितीच्या वतीने शास्तीकर बाधितांचा पिंपरी चिंचवड महापालिकेवर आज गुरुवार (दि. २५) रोजी आकुर्डीतील खंडोबा मंदिरापासून ते काळभोरनगर, चिंचवड, मोरवाडीमार्गे मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ‘रद्द करा….रद्द करा….झिजिया कर रद्द करा’…’शास्तीकर रद्द झालाच पाहिजे’….’अनियमीत घरे नियमित झाली पाहिजेत’..’घर आमच्या हक्काचे….नाही कोणाच्या बापाचे’….’ या घोषणा देत शास्तीकर नोटिसांची होळी करण्यात आली.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, सामजिक कार्यकर्ते मारुती भापकर, नगरसेविका वैशाली काळभोर, विनया तापकीर, नगरसेवक मयूर कलाटे, नाना काटे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे व शास्तीबाधित नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.
दत्ता साने म्हणाले, पिपरी चिंचवड महानगरपालिकेने अनाधिकृत बांधकाम केलेल्या नागरीकांकडून शास्तीकर (मिळकत कराच्या दुप्पट अधिक मिळकत) ३१ मार्च २०१८ पासून वसुल करण्यात येत आहे. हा शास्तिकर म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असा प्रकार असून, शास्तीकर भरुन नागरीक मेटाकुटीस आलेले आहेत. शास्तिकर शंभर टक्के माफ करू म्हणून सत्ताधारी पक्षाने राज्यात, पालिकेत सत्ता मिळवली. परंतु, शास्तिकर शंभर टक्के माफ करू शकले नाहीत. ‘शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, रेडझोन, प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडे बारा टक्के परतवा देण्याचे आमिष सत्ताधाऱ्यांनी दाखविले. मते घेऊन खासदार, आमदार झाले. परंतु, साडेचार वर्ष झोपेचे सोंग घेतले. जिझिया शास्तीकर, मिळकत कर भरू नका, मालमत्तेला टाळे लावण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना ठोकून काढा. शास्तीकर जोपर्यंत माफ होत नाही. तोपर्यंत लढा द्यायचा आहे ‘आमदाराच्या घरावर मोर्चा काढा, असे आवाहन उपस्थित शास्तीबाधीतांना साने यांनी यावेळी केले.











