न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०१९) :- शहरात झालेल्या मुसळधार पावसादरम्यान निगडी परिसरात मुख्य रस्त्यावर एक झाड पडले. झाडपडीच्या घटनामुळे वाहतूक कोंडीच्या घटना घडल्या. त्यामुळे निगडी परिसरातील धोकादायक वृक्षांची छाटणी करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. १३ निगडी, यमुनानगरमधील महाराणा प्रतापपुतळा ते दुर्गानगर चौकापर्यंत ४० ते ४५ वर्षांपूर्वी ग्रीन-ट्री ची झाडे लावण्यात आलेली होती. आजच्या सद्यस्थितीला ही झाडे अत्यंत मोठी झालेली आहे. याच झाडांच्या बुंद्याच्या शेजारुन महापालिकेकडून अमृत योजने अंतर्गत मोठी ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेली होती. यामध्ये या झाडांच्या मुळ्या मोठ्या प्रमाणात तुटल्या गेलेल्या आहेत. झाडे अक्षरक्ष: एका बाजुने वाकली गेली आहेत.
शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने निगडी परिसरात एक मोठे ग्रीन-ट्री चे झाड सकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान रस्त्याच्या मधोमध कोसळले. झाडपडीच्या या घटनेमुळे वाहतूक कोंडीची घटना घडल्या. महापालिका प्रशासन, वाहतूक पोलिस आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी रस्त्यावर पडलेली झाडे शक्य तितक्या लवकर बाजुला करत वाहतूक सुरळीत केली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. निगडी परिसरात असे अजूनही अनेक झाडे आहेत की, ते सद्य परिस्थितीमध्ये कोसळु शकतात. तरी आपण लवकरात लवकरात सदरील झाडांची पाहणी करणे कामी समिती नेमावी व सर्व धोकादायक झाडे १५ फुटांपर्यंत छाटून मिळावी, अशी मागणी चिखले यांनी केली आहे.












