न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ३० जुलै २०१९) :- आजचे युग हे स्पर्धेचे, माहिती तंत्रज्ञानाचे आणि ज्ञानाचे युग आहे. आजच्या तरुण आणि महाविद्यालयीन जीवनात उच्च ध्येय, उद्दिष्टे ठेवली पाहिजेत. आणि त्या ध्येयाच्या दिशेने वाटचालीला जिद्द, चिकाटी व अविरत परिश्रमाची जोड दिली पाहिजे. हेच या स्पर्धेच्या काळात टिकून राहण्याचे आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे माध्यम आहे, असा मनोदय तहसीलदार सागर ढवळे यांनी व्यक्त केला.
एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले हे होते. पारंपरिक शिक्षण आजच्या तरुणाईला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम ठरेलच असे नाही. अशावेळी तरुणांनी स्पर्धा परीक्षांचा मार्ग अवलंबिणे आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत होणाऱ्या विविध परीक्षा आपल्या जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतात, तेव्हा तरुणांनी त्यात झोकून देऊन स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावी असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
डॉ. शकुंतला सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपस्थितांचे आभार डॉ. आनंद हिप्परकर यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. अजित भोसले यांनी केले. कार्यक्रमास उप-प्राचार्य डॉ. महादेव जरे, प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.











