- माझ्या आई वडिलांच्या संस्कारामुळेच माझी या पुरस्कारासाठी निवड
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०१९) :- दिव्या फाउंडेशनच्या वतीने सोमवार (दि. २९) रोजी महाराष्ट्रातील दिग्गजांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात उद्योजक संतोष बारणे यांना ‘दिव्यरत्न जीवनगौरव पुरस्कार २०१९’ हा विशेष पुरस्कार पद्मभूषण डाॅ. विजय कुमार शहा, सेल्सटॅक्स आयुक्त स्वाती थोरात, साहित्यिक गणेश चंदनशिवे, दत्ताकाका बारगाजे, संध्यामाई बारगाजे या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा पुण्यातील मालधक्का येथील डाँ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे सोमवार (दि. २९) रोजी संपन्न झाला.
या पुरस्कार वितरणप्रसंगी उद्योजक संतोष बारणे यांचा गौरव करताना दिव्या फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, ”महाराष्ट्रानं संत घडवले आणि संतांनी महाराष्ट्र घडवला, हे सत्य जाणणार्या वारकरी कुटुंबात आपला जन्म झाला. गार्डनिंगचा व्यवसाय करताना आपण झाडा-फुलांचे पालक बनलात आणि अत्यंत कष्टाने १७ व्यावसायिक कंपन्यांचे मालकदेखील बनलात. खचून गेलेल्या तरुणांनाही नोकरी-व्यवसायात उभं केलं. खूप कमावल्यानंतर सामाजिक भान विसरणारे अनेक धनिक दिसतील; पण वंचितांसाठी सतत ज्यांचं हृदय धडधडतं अशा मोजक्या धनिकांपैकी एक असलेल्या संतोषजी बारणे यांना मानपत्र देताना विशेष आनंद होत आहे.
काळ्या आईच्या सेवेसाठी आपण हातातला पेन टाकून शेतात नांगर धरला. गार्डनिंगचा व्यवसाय करतानाच आपण बांधकाम क्षेत्रात पाऊल ठेवले. आपण उभारलेले प्रकल्प म्हणजे जणू देखणे शिल्पच! सिल्वर ग्रुपचे चेअरमन या नात्याने आपण २ हजाराहून अधिक घरे बांधून त्या ५% घरे ना नफा ना तोटा या तत्वावर दिली. या प्रवासात आपण सामाजिक भान कधी सुटू दिले नाही. समाजातल्या गरजू, अनाथ मुलांना आपल्या शहरातील नामांकीत कंपन्यांमध्ये चांगल्या पदांवर काम दिलं. स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि शैक्षणिक मदत केली. किडनीच्या रुग्णांना आर्थिक मदतीचा हात दिलात. महाराष्ट्रभरातील ४० मुलांचे शैक्षणिक आणि त्यांच्या लग्नाचे पालकत्व स्वीकारले. महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे चेअरमन या नात्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहात. कबड्डी, क्रिकेट, स्विमिंग, रेसलिंग, लॉन टेनिस, फुटबॉल, शरीरसौष्ठव या क्षेत्रातील खेळाडूंसाठी एनआय कोचची नियुक्ती केली ती आपणच. फी न घेता आपण सिल्वर स्पोर्ट क्लबमध्ये खेळाडू घडविता, हे योगदान अमूल्य असेच आहे. विविध पुरस्कारांची मोहोर आपल्या कार्यावर उमटली आहे.
स्वप्नांना जिद्दीचे पंख लावणार्या संतोषजी बारणे या शेतकरीपुत्रास दिव्या फाउंडेशन, बुलढाणातर्फे दिव्यरत्न जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे”.
या सन्मानाला उत्तर देताना उद्योजक संतोष बारणे म्हणाले की, ”दिव्या फाउंडेशन ‘दिव्यरत्न आदर्श जीवन गौरव पुरस्कार” मला दिल्याबद्दल मी मनापासून दिव्या फाउंडेशनचा आभारी आहे. दिव्या फाउंडेशन ही एक अशी संस्था आहे जी, सर्व स्तरामधे निस्वार्थपणे महाराष्ट्रभर काम करत आहे आणि त्यात पद्मभुषन डाॅ. विजयकुमार शहा, सेलटॅक्स आयुक्त स्वाती थोरात, साहित्यिक गणेश चंदनशिवे, दत्ताकाका बारगाजे, सौ. संध्यामाई बारगाजे मान्यवरांच्या हस्ते माझा सन्मान केला. हा पुरस्कार मला माझ्या आई वडीलांच्या संस्कारामुळे मिळालेला आहे. त्यांचे संस्कारच पुढील वाटचालीत आदर्शवादी ठरणार आहेत. दिव्या फाउंडेशनने माझ्या सामजिक कार्याची दखल घेत जीवनगौरव पुरस्कारासाठी माझी निवड केली. या पुरस्काराने मला आणखी सत्कर्म करण्यासाठी बळ दिले आहे. त्यांचा मी ऋणी आहे”.











