न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑगस्ट २०१९) :- राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज गुरुवार (दि. १) रोजी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यभार स्वीकारला.
यावेळी मावळते विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन पेढा भरवून सत्कार केला. यावेळी माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, जेष्ठ नगरसेविका मंगला कदम, प्रशांत शितोळे, नगरसेवक राजू बनसोडे, पंकज भालेकर, वैशाली काळभोर, सुलक्षणा शीलवंत-धर, उद्योजक संदीप काटे सुनील काटे आदी उपस्थित होते.
नाना काटे म्हणाले की, शहरवासीयांना पारदर्शक कारभार करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने कार्यकाळात अनेक चुकीची कामे केली आहेत. त्याचा वेळोवेळी बुरखा फाडण्याचे काम राष्ट्रवादीने इमानेइतबारे केले आहे. ही धगधगती तोफ काही काळ शांत असली तरी, आगामी काही दिवसात सत्ताधाऱ्यांचा पारदर्शक कारभार जनतेसमोर आणून त्याचा सर्जिकल स्ट्राईक केला जाईल. चुकीच्या कामांना विरोध करून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्याचे काम मी विरोधी पक्षनेता या नात्याने करणार आहे.











