न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑगस्ट २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पवारवस्तीतून कुदळवाडीमार्गे जाणाऱ्या उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली आहे. या उड्डाणपूलाला बकालपणा आला असून, त्याचे विद्रूपीकरण होऊ नये, उड्डाणपूल चांगला दिसावा, यासाठी उड्डाणपुलाच्या बाजूला सुशोभीकरण करण्यात यावे.
तसेच उड्डाणपुलाच्या भिंतीवर समाज प्रबोधनात्मक रंगचित्रे रेखाटण्यात यावीत, जेणेकरून नागरिकांना सामजिक भान जपता येईल. तसेच उड्डाण पुलाखालील अंडरपासही सुशोभित करून त्याठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात यावे.
तसेच उड्डाणपुलाची निगा राखण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात, अशी मागणी स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


















