न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑगस्ट २०१९) :- ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात पिचलेल्या देशाला चेतना देण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले. त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव, राष्ट्रीय शिक्षण देणार्या शाळा आणि केसरी व मराठा या सारखी वृत्तपत्रे आपल्या सहकार्यांच्या सहाय्याने सुरू करून जनजागृती केली. याच बरोबर त्यांनी मंडालेतील तुरुंगवासात गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. त्यांचे हे कार्य भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सुवर्णपान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ नीळकंठ चिंचवडे यांनी गुरुवारी केले.
पिंपरी चिंचवड महापालिका आणि दै. केसरीच्या संयुक्त विद्यमाने दै. केसरीच्या पिंपरी चिंचवड विभागीय कार्यालयात लोकमान्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये चिंचवडे बोलत होते. सकाळी साडेअकरा वाजता पिंपरी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रामामध्ये पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते लोकमान्यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार वाहून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक व माजी विरोधीपक्ष नेता दत्ता साने, काँग्रेस आयचे शहराध्यक्ष सचिन साठे, नगरसेविका योगिता नागरगोजे, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.
चिंचवडे पुढे म्हणाले ’लोकमान्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी जनतेला तयार करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्याद्वारे ब्रिटिशांविरोधात जनजागृती करणारी भाषणे करून नागरिकांना परकीय सत्ता उलथून टाकण्यासाठी प्रवृत्त केले. राष्ट्रवाद जोपासण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण देणार्या न्यू इंग्लिश स्कूलसारख्या शाळा स्थापन केल्या आणि केसरी व मराठासारखी वृत्तपत्रे सुरू करून त्यातील अग्रलेखांद्वारे ब्रिटिशावर कोरडे ओढले. सन १८५६ ते १९२० या त्यांच्या आयुष्यातील पहिली सुमारे २४ वर्षे सोडली तर उर्वरित ४० वर्षे त्यांनी स्वराज्य हा एकच मंत्र जपला. त्यांच्यासारखा राष्ट्रप्रेमी पुरुष होणे नाही.
काँग्रेस आयचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनीही लोकमान्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रीय असंतोषाचे जनक असलेल्या लोकमान्यांनी ’स्वराज्य’ हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अशी सिंहगर्जना करत पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्यास जनतेला प्रवृत्त केले त्यांना माझे विनम्र अभिवादन अशा शब्दात साठे यांनी आदरांजली वाहिली.
दिवसभरात शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पिंपरी कार्यालयास भेट देऊन लोकमान्यांना आदरांजली वाहिली.















