न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०१९) :- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त, वक्तव्य करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून महापुरुषाचा अपमान झाला आहे. याबाबत लहू मुद्रा फाउंडेशन च्या वतीने आठवले यांचा निषेध केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, आज शनिवार (दि. ३) रोजी भक्ती-शक्ती येथील पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतर्फे चालू असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी प्रबोधन पर्वास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. आपल्या भाषणा दरम्यान त्यांनी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या गीताचा अपभ्रंश करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अपमान केला.
याचा लहू मुद्रा फाउंडेशन तर्फे जाहीर निषेध करत आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे सर्व समाजाच्या भावना दुखावल्या असून समाज या गोष्टीचा तीव्र निषेध करत आहे. तरी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी या पत्राद्वारे लहू मुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सौंदडे, सचिव महेश खिलारे, खजिनदार राजेश आरसूळ यांनी केली आहे.















