न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०१९) :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संदीप बिश्नोई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पद्मनाभन यांच्या निवृत्तीला अवघा ४० दिवसांचा कालावधी राहिला असल्याने निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे ही बदली करण्यात आली आहे.
एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा निवृत्तीचा काळ सहा महिन्यांपेक्षा कमी असेल तर त्या अधिकाऱ्याकडे निवडणुकीबाबत काम देण्यात येऊ नये, असा निवडणूक आयोगाचा नियम आहे. याच नियमाच्या आधारे आर. के. पद्मनाभन यांची बदली करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त संदीप बिश्णोई यांचे शिक्षण बीए, एलएलबी पर्यंत झाले आहे. १९८९ च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप बिश्णोई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ, खेड विधानसभा मतदारसंघातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवली जाईल. विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी. यासाठी आपले सर्वोच्च प्राधान्य असेल. निवडणुकी दरम्यान येणारा नवरात्रोत्सव शांततेत व्हावा यासाठी नियोजन केले जाईल.












