-
सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांचे विरोधी पक्षांना आवाहन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०१९) :- महाराष्ट्रातील ई.व्ही.एम. ला विरोध करणा-या सर्व विरोधी पक्षांनी निवडणुकीवरील बहिष्कार किंवा “नो बॅलेट नो ओटिंग” किंवा ई.व्ही.एम. व्दारे होणा-या मतदानात प्रत्यक्ष सहभाग, यापैकी नक्की काय ? या बाबत पुढील ४८ तासात स्पष्ट भुमिका जाहीर करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राज्यातील सर्व विरोधी पक्षांना, सामाजिक संस्था व तज्ञ विचारवंतांना केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, लोकशाही प्रक्रियेत स्वच्छ, पारदर्शक, विश्वासार्हता, लोकाभिमुख निवडणूक ही प्रक्रिया लोकशाहीचा आत्मा आहे. असे असताना सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनद्वारे देशात एकूण झालेले मतदान व प्रत्यक्ष मोजलेले मतदान यामध्ये तफावत आढळली. तसेच देशातील एकूण ईव्हीएम मशीनपैकी काही ईव्हीएम मशीन गहाळ झाल्याचे निष्णन्न झाले. या मशीन काही लोकप्रतिनिधीच्या घरात तसेच काही गोडावूनमधे, वेगवेगळ्या वाहनात, कचऱ्याच्या कुंडीत मिळून आल्या, असेही भापकर म्हणाले
तसेच निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदानाची गुप्तता याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे असताना ईव्हीएमद्वारे मतदानातील गुप्तता ही राहत नाही. ईव्हिएम मशिनमधे फेरफार, छेडछाड होऊ शकते. म्हणूनच तर जगातल्या अनेक प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएम मशीन बंद करुन बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वरच घ्यावी, अशी आग्रही मागणी सर्व विरोधी पक्ष, सामाजिक संस्था व तज्ञ, विचारवंतांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र आज मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्राच्या २८८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आधीसूचना २७ सप्टेंबर, नामनिर्देशन पत्र अंतिम मुदत ४ ऑक्टोंबर, छाननी ५ ऑक्टोंबर, माघार ७ ऑक्टोंबर, मतदान २१ ऑक्टोबर व मतमोजणी २४ ऑक्टोबर असा कार्यक्रम जाहीर केला आहे, असेही भापकर म्हणाले
महाराष्ट्रातील विरोधीपक्षांनी, सामाजिक संस्था व तज्ञ विचारवंतांनी या निवडणुकीवरच बहिष्कार घालायचा किंवा बॅलेटवर ही निवडणूक होणार असेल तर तर निवडणूक प्रक्रियाच राबवू द्यायची नाही. म्हणजे नो बॅलेट, नो ओटिंग किंवा आहे त्या परस्थितीत ईव्हीएम मशिनवर मतदान होणार असेल तरी सत्ताधाऱ्यांशी या निवडणुकीत प्रत्यक्ष लढून संघर्ष करायचा यापैकी नक्की ठोस व योग्य निर्णय सर्व विरोधी पक्षांनी सामाजिक संस्थांनी तज्ञ विचारवंतांनी पुढील ४८ तासात घेऊन तो पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करावा. म्हणजे सर्व विरोधीपक्ष व सामजिक संस्थाचे कार्यकत्यांना या निवडणुकीत स्पष्ट दिशा मिळेल. आम्ही जो निर्णय विरोधी पक्षाचा असेल त्याच्या सोबत राहू, असे भापकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.












