- मनसैनिक व शिवसैनिकांची आयुक्तांकडे एकत्रित मागणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट भागातील चऱ्होली-वडमुखवाडी परिसरातील मनसैनिक व शिवसैनिक यांनी एकत्रीत येत, पुणे-आळंदी रोडवरील वडमुखवाडीतील चौकास ‘पद्मावती आंबा बसस्टाॅप’ हे नाव देण्यात यावे. तसेच, येथे गोल सर्कलची उभारणी करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त हर्डीकर यांची भेट घेऊन केली. तसेच, त्यांना मागणीचे निवेदनही दिले.
यावेळी मनसे भोसरी विधानसभा प्रमुख अंकुश तापकीर, शिवसेना युवसेना उप-अधिकारी कुणाल तापकीर, युवराज तापकीर, गौरव तापकीर, सुरज तापकीर आदी उपस्थित होते.
मनसेचे भोसरी विधानसभा प्रमुख अंकुश तापकीर व शिवसेना युवसेना उपअधिकारी कुणाला तापकीर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वडमुखवाडीतील पद्मावती चौक आंबा बस स्टॉप हे नाव जुने असून, ही आमच्या वडमुखवाडीची ओळख आहे. या नावानेच कित्येक दशकांपासून-काळापासून हा चौक ओळखला जातो. तसेच या नावासोबतच वडमुखवाडी ग्रामस्थांच्या भावनाही जोडलेल्या आहेत. या भावनांचा विचार करुन ही मागणी मान्य करावी.
तसेच पुणे-आळंदी रोड हा आळंदी-पंढरपूर महामार्ग असून, या चौकांमध्ये वारंवार अपघात होत आहेत. तरी सदर ठिकाणी गोल सर्कलची उभारणी करून, चौक सुशोभित करावा. तसे न झाल्यास व या चौकाला अन्य कोणतेही नाव देण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे या निवेदनात मनसे व शिवसेनेच्या वतीने म्हटले आहे.












