न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०१९) :- कृत्रिम बूद्धीमत्तेचा वापर करून मानवी जीवन अधिक सुखकर व पर्यावरणपूरक व्हावे, यासाठी कृषि, आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्ता वापरण्याचे जागतिक स्तरावर संशोधन सुरु आहे. या तंत्रज्ञानाचा वापर झाल्यास शेतक-यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे मार्गदर्शन नॅशनल केमिकल लेबॉरेटरीजचे (एनसीएल) वरिष्ठ संशोधक डॉ. एम. कार्तिकेयन यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे ‘कॉम्प्यूटींग, कम्यूनिकेशन कंट्रोल ॲण्ड ॲटोमेशन’ या विषयावरील ‘आयसीक्युब – २०१९’ आंतरराष्ट्रीय परिषदेत दुस-या दिवशी ‘कृत्रिम बुद्धीमत्तेचा कृषी-आरोग्य क्षेत्रात वापर’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. कार्तिकेयन बोलत होते. या वेळी तिजुआना इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजिचे अधिष्ठाता डॉ. ऑस्कर कॅस्टिलो, ऑस्ट्रेलियामधील युनिर्व्हसिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे वरिष्ठ व्यव्सथापक ऋत्विक पुंगलिया, व्हर्लपूल कॉर्पोरेशनचे कृत्रिम बुद्धीमत्ता विभागातील वरिष्ठ अधिकारी बी. प्रशांत, अत्रेय इनोव्हेशनचे डॉ. अनिरूद्ध जोशी, चेन्नई येथील डॉ. एमजीआर संस्थेचे डीन डॉ. एल. रमेश, पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, समन्वयक प्रा. डॉ. के. राजेश्वरी, प्रा. डॉ. लिना शर्मा, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेलचे डीन डॉ. शितलकुमार रवंदळे, डीन डॉ. निळकंठ चोपडे, डॉ. संजय लकडे, डॉ. शितल भंडारी आदी उपस्थित होते.
ऋत्विक पुंगलिया यांनी ‘रिसर्च क्लस्टर शोकेश’ याविषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, आगामी काळात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर माहिती संकलन, माहितीचा अचूक निष्कर्ष मिळविण्यासाठी (डेटा ॲनालिसिस) या क्षेत्रात रोजगार व उद्योगांच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ आणि भारतातील विविध शैक्षणिक संस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांना या विषयावर करिअर व संशोधन करण्याच्या उद्देशाने उच्च शिक्षणाच्या अनेक संधी, सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या संधीचा नव अभियंत्यांनी सकारात्मक विचार करावा.
डॉ. अनिरूद्ध जोशी यांनी ‘पर्सनलाईज् हेल्थ सोल्यूशन्स थ्रू डेटा सायन्स व्हिजन आयुर्वेद’ या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, आयुर्वेदामध्ये रुग्णाचे अष्टविध परिक्षण केले जाते. यामध्ये वात, पित्त, कफ प्रकृतिचा अभ्यास करून रुग्णांच्या नाडी परिक्षणातून निष्कर्ष काढला जातो. रुग्णांची अशीच माहिती अत्रेय इनोव्हेशनच्या माध्यमातून संकलित करून ‘नाडी तरंगिणी’ या नवीन उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यात आला आहे. यातून रुग्णावर उपचार करण्यासाठी खात्रीशीर पर्याय शोधणे शक्य झाले आहे. आयुर्वेद उपचार पद्धतीमध्ये नाडी तरंगिणी उपकरणाचा शेकडो वैद्यांनी वापर करून आतापर्यंत १८ हजारांहून जास्त रुग्णांवर उपचार केले आहेत.
बी. प्रशांत म्हणाले की, गृहिणींचे कष्ट कमी करणारे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून बनविलेली उपकरणे भविष्यात स्वयंपाकघरात कार्यरत झालेली दिसतील. यामध्ये फ्रीज, मिक्सर, वॉशिंग मशीन हे काम सुरु करण्यापूर्वी व काम संपल्यानंतर बोली भाषेत संवाद साधतील. उदा. फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ, भाज्या किती आहेत. किती काळ, किती दिवस टिकतील, खाण्या योग्य आहेत की नाहीत ही माहिती फ्रीज न उघडता मिळणार आहे. अशी बोलणारी उपकरणे बनविण्यासाठी अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात संशोधन व काम सुरु केले आहे. यामुळे गृहिणींच्या कष्टात व खर्चात अमूलाग्र बदल होऊन वेळेची व पैशांची बचत होणार आहे.
डॉ. एल. रमेश यांनी ‘रिझनव्हेंटींग मायक्रो-ग्रीड पॉवर सिस्टिम फॉर झिरो नेट बिल्डिंग थ्रू दी इनरनेट’ या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, वाढत जाणा-या लोकसंख्या व शहरीकरणामुळे विजेची मागणी नेहमीच वाढत राहणार आहे. पारंपारिक पद्धतीने वीज उत्पादन करणा-या कंपन्यांवर अवलंबून न राहता अपारंपारिक उर्जेचा वापर करून वीज उत्पादन करणे शक्य आहे. ज्यामध्ये पवन उर्जा, सौर उर्जेच्या साधनांव्दारे छोटया-मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वीज निर्मिती करता येईल. यातून सोसायटीतील ग्राहकांशिवाय आजूबाजूच्या परिसरातील ग्राहकांची विजेची गरज भागविता येईला. या ’ग्रीन एनर्जी’मुळे पर्यावरणाचे रक्षण होईलच त्यातून वेळेची, पैशाची बचत होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. अशा प्रकारचा पथदर्शी प्रकल्प तामिळनाडूमध्ये उभारण्यात येत असून लवकरच त्याचे लोकार्पण होणार आहे.
या वेळी कविता तिवारी, अभिजित जाधव, स्नेहल राठी यांचा नाविन्यपूर्ण विषयावरील शोधनिबंध सादर केल्याबद्दल गौरव करण्यात आला.
या परिषदेचे आयोजन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. ए. एम. फुलंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्वागत प्रा. डॉ. के. राजेश्वरी, सुत्रसंचालन प्रा. एस. आर. शिर्के, यांनी तर आभार प्रा. डॉ. लिना शर्मा यांनी मानले.











