न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०१९) :- येथील उन्नती सोशल फाऊंडेशन च्या वतीने परिसरातील रिक्षाचालकांसाठी व साफसफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५७ रिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली. यात रक्तदाब, वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोचन, नस्य, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन यासह विविध आजारांच्या मोफत तपासण्या डॉ. ओंकार बाबेल यांच्या ब्रह्मचैतन्य आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये करण्यात आल्या.
यावेळी उन्नती सोशल फाऊंडेशन चे संस्थापक संजय भिसे व डॉ. ओंकार बाबेल यांच्या हस्ते आरोग्य शिबिरामध्ये सहभागी रिक्षाचालकांना मोफत औषध देण्यात आले. याप्रसंगी किशोर पुंडे, महेश जाधव, रमेश भिसे, राजू जाधव, दत्तात्रय साळे यांच्यासह परिसरातील रिक्षाचालक व साफसफाई कामगार, जेष्ठ नागरिक व पिंपळे सौदागर मधील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संजय भिसे म्हणाले की, “धावत्या युगात आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेवर, व्यवस्थित पोहचण्यासाठी सेवा देणारे रिक्षाचालक व आपल्या आजूबाजूचा कचरा साफ करून आपले आरोग्य सदृढ ठेवण्यास खऱ्या अर्थाने मदत करणारे साफ-सफाई कर्मचारी यांची प्रकृती सदृढ राहावी, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उन्नति सोशल फाऊंडेशन च्या वतीने समाजातील गरजू नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात”.















