न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०१९) :- “कमळाबाईला वाकविण्याची धमक फक्त बाळासाहेबांच्या शिवसेनेत होती. आता उलटच होत आहे. आताच्या शिवसेनेमध्ये ती धमक उरलेली नाही. सध्या शिवसेना बॅकफूटवर आहे. राज्यात शिवसेना भाजपच्या काळात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून या शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यावर हे सरकार काहीच बोलायला तयार नाही,’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीतील काळेवाडी येथे झालेल्या मेळाव्यात केली.
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते. पवार म्हणाले, “राज्यातील लघु उद्योग बंद पडत आहेत. कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचे सरकार आहे. तरीही पोस्ट, बीएसएनएल या शासकीय कंपन्यांची काय दुरवस्था झाली आहे? नोकरी मिळत नाही, त्यांची चूल बंद पडत आहे. उज्वला गॅस योजनेची मोठी जाहिरात शासनाने केली. पण, गॅसची किंमत इतकी वाढवून ठेवली आहे की तो घरात आणता येत नाही. पाच वर्षांत राज्यात किती नवीन कारखाने आले ते सरकारने जाहीर करावे? नाहीतर किती कारखाने बंद पडले ते आम्ही सांगतो. आत्ताही राज्यात जनावरांच्या छावण्या सुरू आहेत. अनेक ठिकाणी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. अतिवृष्टीत नागरिकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्यांच्यासाठी या सरकारने काय केले? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.
“भाजप सरकार फक्त जाहिरातबाजी करीत आहे. जर भ्रष्टाचार झालाच नाही, असे भाजपचे म्हणणे आहे तर मग यांच्याकडे इतका पैसा आला कोठून? तुमच्या पक्षाला कोट्यवधी रुपये मिळतात मग बाकीच्या पक्षांना एवढा निधी का मिळत नाही? याचे उत्तर कोणी देऊ शकत नाही.
भ्रष्टाचार झालाच नाही तर जाहिरातींवर खर्च करायला भाजपकडे पैसा आला कुठून – अजित पवार















