न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०१९) :- युतीबाबत आमच्यात संभ्रम नाही. जागा वाटप हा स्थानिक पातळीवरचा प्रश्न नाही. केंद्रीय पातळीवर याबाबत चर्चा सुरु आहे. भाजपात पक्षशिस्त व संघटनेप्रमाणेच केंद्र व राज्यस्तरावर युतीचे निर्णय घेतले जातात. भाजप-शिवसेनेचे उमेदवार ठरल्यानंतरच प्रचारयंत्रणा ठरवू. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येईल. यात शंका वाटत नाही. विरोधी पक्ष गलितगात्र झाला आहे. भाजप मजबूत स्थितीत आहे. कार्यकर्त्यांचे काम वाढले आहे. भाजप राज्यात मोठा विजय मिळवेल. भाजप व महायुतीची सत्ता राज्यात येणारच, असा विश्वास पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
पिंपरीत शहर भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पक्षाने आमची मतं व विविध स्तरावर आमच्या बैठका, अभ्यासवर्ग घेतले. त्यामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप व महायुतीचे मागिलपेक्षा जास्त आमदार वाढलेले दिसतील. पिंपरी-चिंचवड शहरातही भाजपा व महायुतीचे उमेदवार गतवेळेपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होतील, असा दावाही बापट यांनी यावेळी केला.
सभांच्या नियोजनाबाबत बोलताना म्हणाले की, आमचे केंद्रीय नेते, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी भाजपचे नेते सभांना उपस्थित राहणार आहेत.















