न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०१९) :- पंजाब महाराष्ट्र बँकेचे महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येनं खातेदार आहेत. मात्र, या सगळ्या खातेदारांठी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देशाची शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब महाराष्ट्र बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहेत.
त्यामुळे बँकेच्या खातेदारांना दिवसाला फक्त एक हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. बँकेच्या अनेक ठेवीदारांनी कर्ज घेऊन ती परत न केल्यामुळे बँकेवर आर्थिक संकट ओढवलं आणि त्यामुळेच बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्याचं सांगितलं जात आहे. दिवसाला फक्त १ हजार रुपयांचंच बंधन टाकण्यात आल्यामुळे खातेदारांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील डांगे चौक येथील बँकेच्या शाखेत पैसे काढण्यासाठी खातेदारांनी सकाळपासून धाव घेतली. बँकेच्या परिसरातील वातावरण चिंताग्रस्त होते. बँकेत नागरिकांचे पैसे अडकले आहेत. पैसे भेटत नसल्याने खातेदार त्रस्त झाले आहेत. ग्राहकांना होत असलेल्या त्रासाबाबत बँकेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करून बँकला सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.















