न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०१९) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ‘ईडी’ने गुन्हा दाखल केला आहे.
याच्या निषेधार्थ आज बुधवार (दि. २५) रोजी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने भाजप सरकार व ईडीचा पिंपरीतील आंबेडकर चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच जूना पुणे-मुंबई महामार्ग अडवून ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे या महामार्गावर काही तास वाहतूक जाम झाली होती.

‘भाजप-शिवसेना सरकारच्या सुडबुध्दी कारवाईचा तीव्र निषेध’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील वाहन अडवित रस्त्यावर झोपून व घोषणा देत महामार्गावरच आक्रोश केला.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली काळभोर, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, उपाध्यक्ष अमित बच्छाव यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, युवक व युवती तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.















