न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०१९) :- ईडीने माझ्यासंदर्भात शिखर बँक प्रकरणात जो गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्याच्या संदर्भात मी माझी स्वतःची भूमिका अशी आहे की, मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार. नक्की गुन्हा काय केला ते मला समजून घेतलं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
संपूर्ण महिनाभर मी निवडणूक प्रचारासाठी वेळ देणार आहे. त्यामुळे माझं वास्तव्य मुंबईच्या बाहेर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता ईडीच्या ऑफिसमध्ये मी स्वतः जाणार आहे. तिथे जाऊन ईडीचा ‘पाहुणचार’ स्वीकारणार आहे असाही टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांना माझ्याबाबत जी माहिती हवी असेल ती देईन असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
मंगळवारी संध्याकाळी ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भातच शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर माझा पू्र्ण विश्वास आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.















