न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०१९) :- विधानसभा निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी (दि. २७) प्रसिद्ध होणार आहे. शुक्रवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीची माहिती मनीषा कुंभार यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत दिली.
कुंभार म्हणाल्या, ‘शहरी भागातील सर्वात मोठा चिंचवड विधानसभा मतदारसंघ आहे. पाच लाख १६ हजार ८३६ एकूण मतदार आहेत. त्यामध्ये दोन लाख ४५ हजार ४८६ पुरुष तर दोन लाख ४१ हजार ३१८ महिला आणि ३२ इतर मतदार आहेत. लोकसभेनंतर तीन महिन्यात १४ हजार ९६ नव मतदारांची वाढ झाली आहे. पुरवणी मतदारयादी ४ ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे’
चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघासाठी एकच निरीक्षक असतील. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात शनिवारी (दि. २८) कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही, कुंभार यांनी सांगितले. तसेच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनीधींसोबत आज सायंकाळी बैठक होणार आहे.
मतदारसंघात ४३९ मतदान केंद्र असणार आहेत. सहाय्यकारी मतदान केंद्रे ५२ आहेत. ५९ खासगी इमारती आणि ३१ सरकारी इमारतींमध्ये मतदान केंद्रे असणार आहेत. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर २९ आणि दुस-या मजल्यावर १५ मतदान केंद्रे असणार आहेत. त्याठिकाणी लिफ्टीची सोय करण्यात आलेली आहे. 651 दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी तळमजल्यावर मतदान केंद्रे असणार आहेत. मोकळ्या मैदानावर, पार्किंगमध्ये मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.















