न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०१९) :- अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला ही बातमी मला पुण्याला येताना समजली. मला यासंदर्भातली मला कोणताही कल्पना नव्हती. मी त्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क साधला. अजित पवार यांच्या मुलांशी चर्चा झाली. त्यावेळी काकांवर गुन्हा दाखल झाल्याने मी अस्वस्थ आहे असं अजित पवार यांनी मुलांना सांगतिलं. त्याचमुळे त्यांनी राजीनामा दिला असावा असं मला वाटतं आहे असं शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
“अजित पवार म्हणाले की, शिखर बँक घोटाळा प्रकरणात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या सगळ्या घडामोडींना मी तोंड देतो आहे. मात्र यात काकांचं म्हणजे माझं नाव आल्याने अस्वस्थ झालो.” असं अजित पवारांनी त्यांच्या मुलांना सांगितलं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
कौटुंबिक कलहातून अजित पवार यांनी राजीनामा दिला असं वृत्त काही माध्यमं चालवत आहे. मात्र त्यात काहीही तथ्य नाही. पवार कुटुंब एक आहे. त्यात कोणतेही कलह नाहीत असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मी कुटुंबप्रमुख म्हणून मी अजित पवार यांची भेट घेणार आहे. त्यांच्या राजीनाम्याचं कारण मलाही जाणून घ्यायचं आहे असंही शरद पवार म्हणाले.
अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्याशी चर्चा केली. राजकारणात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या मुलाशी चर्चा केली. आपण राजकारणात न राहिलेलं बरं असंही त्यांनी बोलून दाखवलं. माझ्याशी त्यांच्याशी काहीही चर्चा झालेली नाही. त्यांच्याशी चर्चा झाली की मी याबाबत बोलू शकेन असंही पवार यांनी स्पष्ट केलं.












