न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०१९) :- युती होणार की नाही, यावरून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी आज पूर्ण विराम दिला. पण, बाळासाहेबांना वचन दिलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे. त्यामुळे जागावाटपाबरोबरच शिवसेना मुख्यमंत्रीपदही वाटून घेणार का असं नव कोडं राजकीय वर्तुळात निर्माण झालं आहे.
मुंबईतील रंगशारदात शिवसेनेचे २८८ मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आणि जिल्हाप्रमुखांची शनिवारी बैठक झाली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची भूमिका मांडली. ठाकरे म्हणाले, “शिवसेनेची स्थापना कोणताही मुहूर्त किंवा काळ बघून झालेली नाही. एकीकडे देश चंद्राकडे झेप घेतोय. मंगळावर पाणी शोधतोय आणि आपण अजून पत्रिकेत मंगळ शोधत बसलो आहे. आयुष्य बदलण्याची जर कोणत्या खड्यामध्ये ताकद असेल, तर जिवंत माणसांमध्ये की ताकद का नसेल,” असे यावेळी ठाकरे म्हणाले.
“बाळासाहेबांना जाताना मी एक वचन दिलंय. एक ना एक दिवस मी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवणार. बाळांसाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करण्याची मी शपथ घेतली आहे. आपल्याला युतीसाठी काम करायचं आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसेना पोहाेचवायची आहे. युती झाली तर जिथे भाजप असेल तर आपली ताकद त्यांच्यासोबत आणि जिथे शिवसेना असेल तिथे भाजपची ताकद नेहमीच सोबत असायला हवी. जर शिवसैनिक माझ्या सोबत असतील आणि माझ्यावर त्यांचा विश्वास आहे तर मला हवा तसा टर्न मी मारीन.












