न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०१९) :- शिवसेनेच्या वतीने भोसरी विधानसभा मतदारसंघात आज बुधवारी (दि. २) रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेच्या हक्काची भोसरी विधानसभेची जागा भाजपला गेल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत शिवसेनेचे जेष्ठ पदाधिकारी यांनी माजी खासदार यांच्यावर आरोप प्रत्यारोप करीत अर्वाच्च्य भाषा वापरत जोरदार टीका केली. त्यावर जेष्ठ महिला पदाधिकारी यांनी त्या पदाधिकाऱ्याला भाषा व्यवस्थित वापरा असे सांगितले. मात्र त्या पदाधिकाऱ्याने त्या महिला पदाधिकाऱ्याचे न ऐकता त्यांच्यावरच आरोप सुरु केले. शेवटी ते पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांच्यात जोरदार हमरीतुमरी होऊन एकमेकांना मारहाण करण्यात आली. वाद विकोपाला जाताच भोसरी-खेड विधानसभेचे सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद यांनी दोघांना आवर घालत शांत केले.
शेवटी त्या महिला पदाधिकाऱ्याने त्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी चक्क निगडी पोलीस स्टेशन गाठले. अद्याप गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून, हस्तक्षेपासाठी खासदार बारणे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.















