- महामार्गावरून शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या शिवसैनिकाची आस्थेने करतात विचारपूस
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ ऑक्टोबर २०१९) :- मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर पार पडणारा ‘दसरा मेळावा’ हा शिवसैनिकांसाठी पर्वणीच असते. शिवसेना स्थापन केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळावा घेण्याचा पायंडा पाडला होता. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसाच. या दिवशी लाखोंच्या संख्येनं राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या कानाकोप-यातून शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी वाजतगाजत, गुलाल उधळत शिवतीर्थावर या मेळाव्यात सहभागी होतात. याच मेळाव्यात लाखो शिवसैनिक विचारांचे सोने लुटतात आणि राज्याच्या, देशाच्या राजकारणाला दिशा मिळते. प्रथा आणि परंपरेनुसार मेळाव्यात शस्त्र पूजनही केले जाते. या मेळाव्याला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व शिवसेना नेते, उपनेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित असतात. यावर्षीही मंगळवारी (दि. ८) रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात लाखो शिवसैनिकांनी उपस्थित राहून उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकले.
ज्याप्रमाणे हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचा पायंडा पडला, त्याचप्रमाणे शिवसेना कामगार नेते व भोसरी-खेड विधानसभा सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद यांनीही या शिवसैनिकांची सेवा करण्याचा अनोखा पायंडा पाडला आहे. राज्यातील लाखो शिवसैनिक या दिवशी शिवतीर्थावर जमा होण्यासाठी प्रवास करतात. त्यांच्यासाठी सय्यद यांनी मुंबई-पुणे महामार्गावरील टोल नाक्यानजीक, प्रवासादरम्यान ज्यांना भूक-तहान लागली असेल त्यांच्या पोटा-पाण्याची सोय म्हणून मोफत अल्पोपहार तसेच, आवश्यक मदतीसाठी तात्पुरत्या मदत केंद्राची सोय केली होती.

अधिक माहिती देताना इरफान सय्यद म्हणाले की, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात गेल्या ५३ वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा होतो आहे. या मेळाव्यात महाराष्ट्रातून लाखो शिवसैनिक, शिवसेना समर्थक व लोकं दसऱ्याच्या दिवशी दिवंगत हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी दादरमधील शिवाजी पार्कवर जमा होत असे. बाळासाहेबांच्या अमृतवाणीने हर एक कार्यकर्त्याच्या अंगी छत्रपतींचा मावळा असल्याची भावना जागृत होत असे. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांची गादी पुढे चालवत आहेत. त्यांची अमोघ वक्तृत्वशैली ऐकण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिकांची लाखोंची फौजच शिवाजी पार्कवर जमा होते. राज्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या व शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या हर एक शिवसैनिकाचे स्वागत व त्याची खाण्याअभावी गैरसोय होऊ नये म्हणून प्रतिवर्षी या दिवशी मावळातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०४, उर्से टोलनाक्याजवळ मोफत अल्पोहाराची सोय केली जाते तसेच, तात्पुरते मदत केंद्र उभारून त्यांचा शिवाजी पार्ककडील प्रवास अधिक सुखकारक कसा होईल? याची काळजीही घेतली जाते.















