न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०१९) :- २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूकीकरीता दिव्यांगांसाठी सर्व मतदान केंद्रे ही तळमजल्यावर देण्यात आली असून कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये याकरीता सर्वांनी जास्तीत जास्त जनजागृती करून मतदान करावे आणि मतदानाची टक्केवारी वाठविण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त प्रसार करावा. असे आवाहन २०५, चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी राधिका हावळ यांनी केले.
जिल्हा निवडणूक कार्यालय पुणे आणि २०५ चिंचवड आणि 20६ पिंपरी विधानसभा मतदारसंघ यांचे संयुक्त विद्यमाने प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह ते क्रांतीवीर चाफेकर चौक, चिंचवडगांव अशी भव्य दिव्यांग विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. त्याच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या भाषणात त्या बोलत होत्या. दिव्यांग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी वाढवून त्यांच्या निवडणूकीविषयी जागरूकता वाढविणे हा रॅलीचा प्रमूख उद्देश होता. दिव्यांग मतदारांसाठी यावेळी मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर स्थापन करण्यात आलेले आहेत. त्यामुळे यंदा दिव्याग मतदारांना मतदान करण्यास अडचण येणार नाही. असे सांगून त्यांनी दिव्यांगांसाठी स्वीप उपक्रमातंर्गत विकसित केलेल्या पी. डब्लू. डी ॲप प्रकीयेची माहीती दिली.
याप्रसंगी २०५ विधानसभा मतदारसंघाचे नोडल ऑफीसर अण्णा बोदडे, २०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे मतदान नोंदणी अधिकारी सुनिल वाघमारे, नोडल अधिकारी बापूसाहेब गायकवाड, दिव्यांग नोडल अधिकारी रामकृष्ण आघाव तसेच २०५ चे दिव्यांग नोडल अधिकारी संभाजी ऐवले, सहाय्यक बाळासाहेब गंधट, मुकेश कोळप, भाउसाहेब कांबळे, आदि उपस्थित होते.
सदर फेरीची सुरवात निवडणूक स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदान जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरण करून सुरूवात करण्यात आली. या फेरीमध्ये चिंचवड येथील मुक बधीर विद्यालय, अंध कार्यशाळा अपंग विद्यालय, निगडी येथील कामायनी मतिमंदविद्यालय, ब्रम्हदत्त मतिमंद विद्यालय साई संस्कार मतिमंद मुलांची शाळा, या शाळांतील विद्यार्थी, शिक्षक तसेच प्रहार अपंग क्रांती आंदोलन, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाघचौरे, पिंपरी चिंचवड कर्णबधीर असोसिएशनचे अध्यक्ष परशुराम बसवा, गणेश कानपिळे झुंज अपंग संस्था, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बाळासाहेब तरस आदि सहभागी झालेले होते. या फेरीमध्ये सर्व शाळांमधील एकूण १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या फेरीचा समारोप क्रांतीवीर चाफेकर चौक, चिंचवडगांव येथे करण्यात आला.
तसेच कार्यक्रमाची सांगता व आभारप्रदर्शन २०५-चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दिव्यांग नोडल अधिकारी –संभाजी ऐवले यांनी केले. या कार्यक्रमासाठी २०५-चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा कुंभार आणि २०६-पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली उंटवाल यांनी मार्गदर्शन केले.


















