आ. लांडगे यांना लाखांचे मताधिक्य मिळवून देऊन विजयी करूशिवसेनेच्या बैठकीत शिवसैनिक व पांडाभाऊ साने यांची भीमगर्जना
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रचारार्थ आज गुरुवारी (दि. १०) रोजी चिखलीतील प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपशहर प्रमुख नेताजी काशीद, माजी नगरसेवक गीताराम मोरे, भाजपा युवा नेते पांडाभाऊ साने, नगरसेवक कुंदन गायकवाड, सामजिक कार्यकर्ते संजय मोरे, तसेच चिखली, पाटीलनगर, गणेशनगर, मोरे वस्ती, सोनवणे वस्ती परिसरातील भाजप व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबर संपूर्ण राज्यात युती केली आहे. भोसरी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महेशदादा लांडगे हे आहेत. सर्व शिवसैनिकांनी पक्षाप्रमुखांच्या आदेशाचे पालन करून, महायुतीचे उमेदवार महेशदादा लांडगे यांचा एकमताने प्रचार करायचा आहे. त्यांना प्रभागातून मताधिक्क्य मिळवून द्याचे आहे. त्यासाठी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जोमाने कामास लागावे, अशा सूचना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना केल्या. महायुतीचा उमेदवार घराघरात व मनामनात पोहोचविण्याचा निर्धारही यावेळी शिवसैनिकांनी केला.
उपस्थित शिवसैनिकांना प्रोत्साहित करताना युवा नेते पांडाभाऊ साने म्हणाले की, युतीत भोसरी मतदारसंघ हा भाजपला सुटला. त्यामुळे शिवसैनिकांचा काहीवेळ हिरमोड झाला होता. तुमच्या व्यथा आम्ही जाणतोच. मात्र, हे निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केव्हाच मनोमिलन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात शिवसैनिक संघटित होऊन महायुतीच्या उमेद्वाराच्या प्रचाराला लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भोसरी मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार आपला आहे. जिवाभावाचा आहे. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आपणाला आणायचे आहे. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात आपल्यालाच बळकट करावे लागतील. तेव्हा आपण सर्वजण एक होऊ व आपली वज्रमुठ करू. विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पळता भुई थोडी करू व आ. लांडगे यांना लाखांचे मताधिक्य मिळवून देऊन विजयी करू, असा निर्धार यावेळी साने यांनी बैठकीत व्यक्त केला.


















