न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०१९) :- चिखलीतील आय. आय. बी. एम. ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट या संस्थेच्या वतीने बुधवार (दि. ९) रोजी शितलताई धनंजय वर्णेकर यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार वितरण समारंभात आय. आय. बी. एम. कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत यांना सन ‘२०१८-१९ उत्कृष्ट प्रतिसाद, कामाशी एकनिष्ठ’ अशा दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
गेल्या सहा वर्षांपासून अमोल भागवत हे संस्थेशी एकनिष्ठ आहेत. तसेच संस्थेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवतात. संस्थेच्या वाढीसाठीही प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या कामांची दाखल घेऊनच त्यांना संस्थेचे संस्थापक डॉ. धनंजय वर्णेकर, संचालक राम रैना, शितलताई धनंजय वर्णेकर यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट प्रतिसाद व कामाशी एकनिष्ठ’ ही दोन पुरस्कार प्रदान करण्यात आली.
पुरस्कार वितरणप्रसंगी डॉ. धनंजय वर्णेकर आपल्या मनोगतात म्हणाले की, या संस्थेत भागवत यांच्यासारखी कुशल प्राध्यापकं आहेत, म्हणूनच संस्थेची वाटचाल यशाकडे होत आहे. संस्थेतील सर्वच जण आप-आपली जबाबदारी सांभाळून प्रामाणिकपणाने काम करीत आहेत. त्यामुळेच आज आय.आय.बी.एम ही संस्था महाराष्ट्रात नामांकित संस्था म्हणून उदयास येत आहे. २०१९ अखेरपर्यंत महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात संस्थेचा शाखा विस्तार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. जेणेकरून २०२५ पर्यंत संपूर्ण देशात संस्थेचा विस्तार झालेला पहावयास मिळेल. यासाठी भागवत सरांसारख्या कुशल मनुष्यबळाची संस्थेला गरज आहे. यावेळी २०१८-१९ मध्ये उत्कृष्टरित्या काम केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदनही संस्थापक वर्णेकर यांनी केले.
संचालक राम रैना म्हणाले की, आज आय.आय.बी.एम. संस्थेचे काही विद्यार्थी भारतात व परदेशात पोहोचले आहेत. याचे श्रेय भागवत सरांसारख्या गुणी प्राध्यापकांमुळेच. याचा मला अभिमान आहे. येणाऱ्या पुढील वर्षात संस्थेचे १०० पेक्षा जास्त विद्यार्थी परदेशात पोहचले पाहिजेत, अशी जबाबदारी देऊन भागवत यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अमोल भागवत म्हणाले की, या पुरस्कारामुळे माझा आत्मविश्वास दुणावला आहे. माझ्या कार्याची ही पोचपावती आहे. पुरस्कारामुळे मोठी जबाबदारी संस्थेने माझ्यावर सोपविली आहे. संस्थेने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे व एकनिष्ठपणे पूर्ण करीन. तसेच पुढील काळात या संधीचे सोने केलेले सर्वाना दिसेल. त्यासाठी संस्था माझ्या पाठीशी आहे. संस्थेने माझी या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल संस्था प्रमुखांचे, सर्व सहकारी वर्गाचे आभार मानतो. यावेळी सौ. शितलताई वर्णेकर यांच्या अभिष्टचिंतनाचा केक कापून कार्यक्रमाची सांगता झाली.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास डॉ. धनंजय वर्णेकर, संचालक राम रैना, सौ. शितलताई धनंजय वर्णेकर, सेक्रेटरी काळभोर सर, विभागप्रमुख डॉ. तेजस्विनी गायकवाड व सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थितीत होते.















