न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०१९) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, नगरसेवक, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
शहरातील प्रश्नांना हात घालत मुख्यमंत्री म्हणाले, पिंपरी-चिंचवडला २४ तास पाणीपुरवठा देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन रखडलेली पाणीयोजना मार्गी लावण्यात येईल. दहा वर्षांपासून पोलीस आयुक्तालय हवे, ही मागणी होती. ती आपल्या सरकारने पूर्ण केली. पिंपरीला स्मार्ट सिटीत सहभागी करून घेतले.
शास्तीकराचा निर्णय घेतला. मेट्रोचे काम सुरू केले. वाहतूक सुविधा सक्षम करण्याचे धोरण आहे. नद्यांचे वाढते प्रदूषण लक्षात घेऊनच नदीसंवर्धनाचे काम सुरू आहे. शहर विकासासाठी केंद्राने हजारो कोटी दिले, राज्याचीही तीच भूमिका आहे. प्रत्येक शहराचे चित्र बदलले पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे.


















