न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०१९) :- प्रभाग क्रं. २६ मधील सोसायटीधारकांनी NO WATER, NO VOTE पवित्रा घेतला आहे. पाणीप्रश्न न सुटल्यामुळे मतदानावर बहिष्काराची भूमिका सोसायटीधारकांनी घेतली आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक तुषार कामठे यांनी आगामी काळात पाणीप्रश्न न सुटल्यास महानगरपालिका निवडणुकीत सोसायटीधारकांनी लोकप्रतिनिधी म्हणुन मला जबाबदार धरावे अशा आशयाचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
या निवेदनात कामठे यांनी म्हटले आहे की, आज आपल्या प्रभाग क्रं २६ मधील पाणीटंचाईवरून सर्व सोसायटीधारक व बैठी घरधारकांनी काढलेल्या मूक मोर्चा व NO WATER, NO VOTE मुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत वाईट वाटत आहे. परंतु, पाणीप्रश्न सोडवणे हा स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने आमची व महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामध्ये आम्ही कमी पडलो आहे. त्यामुळे प्रथम आपली माफी मागतो. त्यामध्ये विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य यांचा काहीही संबंध नाही. परंतु, आपण घेतलेली भूमिका NO WATER , NO VOTE ही चुकीची असुन येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणे लोकशाहीच्या विरोधात होईल.
त्याचा दोष आमदारांना न देता त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण आपला मतदानरुपी हक्क बजावावा व तुमचा जो रोष असेल तो स्थानिक महापालिका निवडणुकीमध्ये काढावा. निवडणुकीमध्ये आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून तुम्हाला आता शब्द न देता निवडणुकीनंतर आपण सर्वजण मिळून मार्ग काढू. मी सदैव तुमच्या बरोबर होतो, आहे व भविष्यातपण असेल. तरी आपण आपला निर्णय मागे घ्यावा. तुम्हाला होत असलेल्या त्रासाबद्दल पुनश्चः एकदा क्षमस्व, असे या निवेदनात कामठे यांनी म्हटले आहे.












