- सुनिल शेळके यांनाच कुसगाव वाकसई गटातून भरघोस मताधिक्य देण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५) :- मावळ तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाच्या दिलेल्या उमेदवारीवरून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या मनात काही संभ्रम निर्माण केला जात आहे. सोशल मीडियावरून सर्रास चुकीचे मेसेज पाठवले जात असल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. आम्ही राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते असून सुनिल शेळकेंनाच पाठिंबा देणार असल्याचे एका पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
सोमवारी (दि. १४) बाळासाहेब नेवाळे हे पक्षाबरोबर राहतील असा निरोप मिळाल्याने काही कार्यकर्ते तेथे उपस्थित राहिले होते. परंतू या सभेत बाळासाहेब नेवाळे यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. याबाबत तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली. परंतु या ठिकाणच्या चुकीच्या बातम्या सोशल मिडीयामार्फत पसरवण्यात आल्या.
याबाबत खुलासा करण्यासाठी आज मंगळवारी (दि. १५) रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीस राष्ट्रवादी कॉग्रेसचे मावळ तालुका कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, जिल्हापरिषद सदस्या कुसुमताई ज्ञानेश्वर काशिकर, पंचायत समिती सदस्य महादु उघडे, सदस्या राजश्री संतोष राऊत, माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, माजी जिल्हापरिषद सदस्या गंगाताई कोकरे, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण बालगुडे, राजूशेठ देवकर, सुरेश कडू, किरण हुलावळे, अमोल केदारी, बाळासाहेब येवले, संतोष राऊत, जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष भगवान दादा डफळ, तानाजी पडवळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुसगाव – वाकसई गट हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला मजबूत ठेवणार असल्याचा निर्धार ह्या वेळी करण्यात आला. तसेच पक्ष विरोधी भूमिका घेणाऱ्या कोणत्याही नेतृत्वाच्या पाठीमागे ह्या भागातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता जाणार नाही, हा निर्धार एकमुखाने करण्यात आला.
संपूर्ण कुसगाव वाकसई जिल्हापरिषद गट राष्ट्रवादीपक्षा बरोबर राहणार आहे. कार्यकर्त्यांनी कुठल्याही भुलथापांना बळी पडू नये, चुकीच्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष दिपक हुलावळे यांनी केले.


















