न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी १८ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या सभेत ऐन वेळच्या तब्बल ३२३ कोटी ३२ लाखांच्या खर्चाच्या एकूण ८० विषयांना चर्चेविना मंजुरी दिली होती. विशेष म्हणजे ” स्थायी ‘ च्या या विषयांमध्ये शहरातील आपत्कालीन व तातडीचे विषय नव्हते.
पहाटे तीन वाजेपर्यंत महापालिकेच्या स्थायी समितीने कामकाज करून संबंधित ठेकेदारांना ” वर्क ऑर्डर ‘ दिली होती. ही वर्क ऑर्डर रद्द करून स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली होती.
या तक्रारीची राज्य शासनाने दखल घेतली असून, चौकशी अहवाल पाठविण्याचे महापालिका आयुक्तांना राज्य शासनाने आदेश दिले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी दिली आहे.













