- भाजप नगरसेवक उत्तम केंदळे यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ नोव्हेंबर २०१९) :- पदवीधर व शिक्षक मतदार संघ नाव नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे यांनी डॉ. दिपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणीसाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर हे जिल्हे येतात. आपल्याकडून दिलेली अंतिम दिनांक ६ नोव्हेंबर २०१९ आहे. ज्या दिवसापासून पदवीधर निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहिर झाला आहे, त्या दिवसापासून दोन निवडणुका झाल्या आहेत. लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा यामुळे कमी प्रमाणात नाव नोंदणी झाली असे आढळून येते.
या निवडणूक आचारसंहितामुळे मुख्याध्यापक शिक्षक, सरकारी अधिकारी, कर्मचारी दोन्ही निवडणुकीत व्यस्त होते व त्यामध्ये दीपावलीची सुट्टी असल्यामुळे पदवीधर व शिक्षक मतदार नाव नोंदणी ज्या प्रमाणात झाली पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही. नुसतेच पुणे विभागामध्ये नाव नोंदणी कमी झाली असे नाही, पूर्ण महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे. नविन मतदार नाव नोंदणीसाठी एक महीना मुदतवाढ द्यावी. अन्यथा अनेक पदवीधर आणि शिक्षक या निवडणुकीसाठी मतदान करण्यापासून वंचित राहतील. कारण पूर्वीची नोंदणी आपण रद्द केलेली आहे. नव्याने नाव-नोंदणी करताना याचा विचार केला गेला पाहिजे. त्यामुळे पुण्यासह राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यासाठी हालचाली कराव्यात, असे या निवेदनात नगरसेवक केदळे यांनी म्हटले आहे.














