न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिका शहरात क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक विभागासंबधी ज्या सुविधा विकसित करणार आहे. त्यासाठी स्थापत्य उद्यानासारखाचा स्थापत्य ‘क्रीडा विभाग’ तयार करून, त्या विभागामार्फत संपुर्ण शहरातील क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक विभागासंबधीचे विकासकामे करण्यात यावीत, अशी मागणी कला, क्रीडा, सांस्कृतिक विभागाचे सभापती तुषार हिंगे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात हिंगे यांनी म्हटले आहे कि, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहर परिसरात नव्याने क्रीडा सुविधा विकसित करणेत येत असतात. अशा सुविधा क्षेत्रिय कार्यालयनिहाय विकसित करणेत येतात. तथापि अशा सुविधा विकसित करताना क्रीडा विभागाचा अथवा मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचा अभिप्राय घेतला जात नाही.
त्यामुळे क्रीडा विभागाशी संबधीत तातडीची वा आवश्यक स्थापत्य विषयक व इतर कामे जशी होणे अपेक्षित आहे, तशी न झाल्याने त्याचा नागरिकांना उपयोग होत नाही. परिणामी त्या विकासकामावर केलेला खर्चही व्यर्थ होत असल्याने महापालिकेचे नुकसान होत आहे.
महापालिका शहरात क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक विभागासंबधी ज्या सुविधा विकसित करणार आहे. त्यासाठी स्थापत्य उद्यानासारखाचा स्थापत्य ‘क्रीडा विभाग’ तयार करावा व त्या विभागामार्फत संपुर्ण शहरातील क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक संबधी संपुर्ण विकासकामे विकसित करणेत यावीत. यासाठी स्थापत्य क्रीडा विभाग तयार करुन त्याकरीता आवश्यक मनुष्यबळ देणेबाबत योग्य ती कार्यवाही करणेबाबत संबधित विभागास आपणांमार्फत आदेशित करणेत यावे, असे या निवेदनात हिंगे यांनी म्हटले आहे. त्यांनी या निवेदनाची प्रत मा. सहाय्यक आयुक्त, प्रशासन यांनाही दिली आहे.














