- विधानसभेच्या निकालामुळे कलाटे यांची मनःस्थिती बिघडली
- भाजपचे राम वाकडकर, विशाल कलाटे यांची घणाघाती टिका
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०१९) :- शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे हे शहरातील पाणीटंचाईच्या मुद्द्यावर डबल ढोलकीचे राजकारण करत आहेत. त्यांनी वाकड परिसराच्या विकासालाही खीळ घातलेली आहे. अपवाद वगळता ३५ ते ४० वर्षे स्वतःच्याच घरात नगरसेवकपद असताना त्यांनी या भागासाठी काय केले हे सांगावे, असे आव्हान भाजपचे कार्यकर्ते राम वाकडकर आणि विशाल कलाटे यांनी दिले आहे. पाण्याचा प्रश्न हा आमदाराने नव्हे तर नगरसेवकांनी सोडवायचा असतो, एवढे ज्ञान सुद्धा त्यांना नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खोट्या आवाजापासून ते इतर अनेक क्लृप्त्या लढवूनही विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांची मन:स्थिती बिघडलेली आहे. ते नेमके कोणत्या पक्षाचे आहेत हेच त्यांना सांगता येणार नाही. आता स्वतःचे राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्यापुढे प्रसिद्धीझोतात राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही, अशी घणाघाती टिकाही भाजपचे कार्यकर्ते राम वाकडकर आणि विशाल कलाटे यांनी केली आहे.
यासंदर्भात राम वाकडकर आणि विशाल कलाटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवडमधील पाणीटंचाईवर आता गांभीर्याने विचार झाला पाहिजे. शहरातील अनधिकृत नळजोडांबाबत ठोस भूमिका घेण्याची आता वेळ आली आहे. तसेच नव्याने बांधकामे उभी राहिल्यास पाणीटंचाईचा प्रश्न आणखी गंभीर बनणार आहे. त्यामुळे नवीन बांधकामांना परवानगी द्यायची किंवा नाही याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. तसेच टँकर माफियांना शहरातून हद्दपार केल्यास पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता येणे शक्य होणार आहे. या सर्व पर्यायांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने विचार करावा म्हणून एखाद्या लोकप्रतिनिधीने मागणी किंवा सूचना केल्यास शिवसेना बंडखोर राहुल कलाटे यांना मिरची झोंबण्याचे काहीच कारण नव्हते. शहरातील अनधिकृत नळजोडामुळे दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी होते. परिणामी अनेक प्रामाणिक करदात्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. अनधिकृत नळजोडधारकांनी आपले नळजोड अधिकृत करून घ्यावेत यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनेकदा अभय योजना देखील राबविलेली आहे.
परंतु, अनधिकृत नळजोडधारकांनी आपले नळजोड अधिकृत करून घेतलेले नाहीत. त्यामुळे आता कठोर पावले उचलावीच लागणार आहेत. अशा अनधिकृत नळजोडधारकांवर गुन्हे दाखल झाल्यास पाणीचोरीला आळा बसल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे वाढती लोकसंख्या आणि मिळणारे पाणी याचा विचार केल्यास नवीन बांधकामांना परवानगी देणे म्हणजे शहराला गंभीर पाणीटंचाईकडे नेण्यासारखे ठरणार आहे. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये यापूर्वी पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्याची अनेक उदाहरणे आहेत. तीन वर्षांपूर्वी ठाणे शहराला पाणीटंचाई जाणवू लागल्यानंतर उच्च न्यायालयाने “बांधकामे थांबू शकतात, पण माणसे पाण्याविना जगू शकत नाहीत”, असे निरीक्षण नोंदवत घोडबंदर रोड परिसरातील नव्या बांधकामांना बंदी घातली होती. एवढेच नाही तर नव्या बांधकामांच्या प्रस्तावांना सीसी देऊ नका आणि बांधकाम पूर्ण झालेल्यांना ओसी देऊ नका, असे आदेशही न्यायालयाने दिले होते.
त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने नवीन बांधकामांना परवानगी द्यायची की पाण्याविना माणसे जगू नयेत, अशी परिस्थिती निर्माण करायची याचा निर्णय घेणे गरजेचे आहे. परंतु, या मुद्द्याचे शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांनी राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला. मुळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमदारांनी नव्हे; तर नगरसेवकांनी सोडवायचा असतो, याचे ज्ञान सुद्धा त्यांना नाही. अनेक क्लृप्त्या लाढविल्यानंतर देखील ते विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नक्कल करणाऱ्या खोट्या आवाजाचा वापर करून देखील त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यामुळे त्यांची मनःस्थिती बिघडली आहे. ते नेमके कोणत्या राजकीय पक्षात आहेत, हे सुद्धा त्यांना सांगता येणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही मुद्दयाचे भांडवल करून प्रसिद्धीझोतात राहण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. महापालिकेच्या सभागृहात पाणीटंचाईवर आयुक्त आणि अधिकाऱ्यांना जाब विचारायचे आणि प्रशासनाने काही कठोर निर्णय घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला विरोध करायचा, असे डबल ढोलकीचे राजकारण कलाटे करत आहेत.
राहुल कलाटे हे वाकड भागाचे नगरसेवक आहेत. या भागाचा विकास त्यांनीच रखडवलेला आहे. प्रत्येक कामात आडकाठी आणून स्व:हित साधण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. अनेक रस्त्यांच्या कामांची त्यांनी अडवणूक केलेली आहे. काही रस्त्यांच्या जागा तर मोबदला घेऊन सुद्धा त्यांनी महापालिकेच्या ताब्यात दिलेल्या नाहीत. वाकड भागातील गृहनिर्माण सोसायट्यांतील नागरिकांना ते पाण्यासाठी नेहमी वेठीस धरतात. या भागातील टँकर माफिया कोण आहेत? त्यांना कोण पोसतो?, हे येथील जनतेला सर्व काही माहिती आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून अपवाद वगळता गेली ३५ ते ४० वर्षे या भागातील नागरिकांनी कलाटे कुटुंबातीलच सदस्याला नगरसेवक म्हणून निवडून दिलेले आहे. आता ते स्वतः नगरसेवक आहेत. त्यांनी या भागाचा काय विकास केला, हे जनतेला सांगावे. त्यांनी येथील नागरिकांचा नेहमी विश्वासघातच केलेला आहे. त्याचे फळ विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेले आहे. आता फक्त प्रसिद्धीझोतात राहण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच उरलेले नाही, अशी टिका राम वाकडकर आणि विशाल कलाटे यांनी केली आहे.”















