- पक्षविरोधी भूमिका घेतल्यास नगरसेवकांचे निलंबन
- महापालिका बैठकीत शहरातील दोन्ही आमदारांचा नगरसेवकांना अल्टीमेटम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दालनात आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी भाजप नगरसेवकांची गुरुवारी (दि. १४) रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भाजपचे नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते. यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप व भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांचा नगरसेवकांनी सत्कार केला.
लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदारसंघात मताधिक्क्य कमी झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली. तसेच भोसरी विधानसभेत मताधिक्य वाढले असल्याचे आमदार लांडगे म्हणाले.
पिंपरी चिंचवड महापालिकेत २०२० ला पुन्हा भाजपची सत्ता आणायची आहे. त्यासाठी सर्व नगरसेवकांनी प्रभागातील विकासकामांकडे लक्ष पुरवावे. उठसुठ पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या त्या आठ नगरसेवकांमुळे पक्षाची प्रतिमा खराब झाली आहे. विरोधक त्याचा गैरफायदा घेत आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे त्यांच्यामुळे नुकसान झाले आहे. यापुढे पक्षाविरोधात भूमिका घेतल्यास अशा नगरसेवकांना निलंबित केले जाईल. शहरात अनधिकृत बांधकामामुळे बकालपण वाढत आहे. परवानगी घेऊनच बांधकामे झाली पाहिजेत, त्यासाठी आग्रही रहा, असा सल्ला शहरातील भाजप आमदारांनी नगरसेवकांनी यावेळी दिला.















